: सततचा दुष्काळ, नापिकी, शेतमालाचे कोसळलेले भाव यामुळे शेतकर्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असून जानेवारी ते सप्टेंबर 2018 या नऊ महिन्यात एकट्या मराठवाड्यात तब्बल 674 शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे. 2001 ते ऑक्टोबर 2018 या 18 वर्षांत विदर्भातील सुमारे 15 हजार 629 शेतकर्यांनी मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक आकडेवारी या उत्तरातून समोर आली आहे.
नापिकी, बोंडअळीमुळे पिकांचे झालेले नुकसान, दुष्काळी परिस्थिती व शेतमालाला मिळणार अनिश्चित दर आदी कारणांमुळे राज्यातील शेतकर्यांनी केलेल्या आत्महत्यांच्या संदर्भात परभणीचे आमदार राहुल पाटील, लातूरचे त्र्यंबकराव भिसे, राधाकृष्ण विखे-पाटील आदी सदस्यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आत्महत्येची आकडेवारी दिली आहे. राज्यात विविध कारणांमुळे सप्टेंबर 2018 या एका महिन्यात 235 आत्महत्यांची प्रकरणे निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले आहे. विदर्भातील 6 जिल्ह्यांमध्ये जानेवारी 2001 ते ऑक्टोबर 2018 पर्यंत विविध कारणांमुळे 15 हजार 629 आत्महत्या घडल्या असून त्यापैकी 7008 प्रकरणे निकषांमध्ये पात्र ठरली असून 8406 प्रकरणे अपात्र ठरविली आहेत. 215 प्रकरणे चौकशीमुळे प्रलंबित असून पाच आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबीयांना 1 लाख रुपयांची आर्थिक मदत केल्याचे पाटील यांनी सांगितले. मराठवाड्यात आत्महत्याग्रस्त 674 शेतकर्यांपैकी 445 प्रकरणे पात्र ठरली असून त्यांनाही प्रत्येकी 1 लाखांची आर्थिक मदत केली आहे. नाशिक जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर 2018 या कालावधीत 73 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या असून त्यापैकी 17 प्रकरणे पात्र ठरली आहेत. त्यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. कोल्हापूरमध्ये 2004 ते जून 2018 या कालावधीमध्ये 113 शेतकर्यांनी मृत्यूला कवटाळले. आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुुंबीयांना आर्थिक मदत देण्यासह अपात्र ठरलेली प्रकरणे पात्र करण्यासाठी नियमावलीत शिथिलता आणण्याची बाब सरकारच्या विचाराधीन नसल्याचे सांगत आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध योजना राबविण्याचे निर्देश देण्यात आल्याचे चंद्रकांत पाटील यांनी उत्तरात म्हटले आहे. |
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment