0
जम्मू/नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात ताबा रेषेवर रविवारी एका पाकिस्तानी हेलिकॉप्टरने सीमेच्या आत ७०० मीटर अंतरापर्यंत घुसखोरी केली. या हेलिकॉप्टरवर सुरक्षा दलांनी गोळीबार केला. मात्र, अधिक उंचीवर असल्याने हेलिकॉप्टर परत फिरले. माध्यमांच्या दाव्यानुसार हेलिकॉप्टरमध्ये पाकव्याप्त काश्मीरचे पंतप्रधान फारूक हैदर होते. हेलिकॉप्टर नंतर कहुटामध्ये लँड झाले.
दु.१२.३०वा.... : जम्मूतील लष्कराचे प्रवक्ते कर्नल देवेंद्र आनंद म्हणाले, दुपारी १२.३० वा. पांढऱ्या रंगाचे हे हेलिकॉप्टर परतताना काही काळ भारतीय हद्दीत होते. दरम्यान, संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी पाकच्या या कुरापतीकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याचे म्हटले.

माेदींचा इशारा : आम्हाला शांतता हवी, पण स्वाभिमानाशी तडजोड नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात पाकचे नाव न घेता सज्जड इशारा दिला. भारताला शांतता हवी आहे. मात्र, यासाठी सार्वभौमत्व, स्वाभिमान आणि प्रतिष्ठेशी तडजोड केली जाणार नाही. दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिले जाईल, असे मोदी म्हणाले. सर्जिकल स्ट्राइकचाही उल्लेख त्यांनी केला. मोदी म्हणाले, आमची शांतता, प्रगती आणि सौहार्द नष्ट करण्याचा जे कुणी प्रयत्न करतील त्यांना आमचे सैनिक सडेतोड उत्तर देतील.

दहशतवादाची भुते घडवणे पाकने बंद करावे : संयुक्त राष्ट्रसंघ 
भारत-पाक चर्चेत भारतानेच खाेडा घातल्याचा आरोप पाकचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत केला. यावर भारताच्या सचिव अॅनम गंभीर यांनी शेजारी देशाने दहशतवादी भुते निर्माण करणे बंद करावे, अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले.

शोपियात बुरखाधारी दहशतवाद्यांचा हल्ला, जवान शहीद
श्रीनगर : शोपिया जिल्ह्यात रविवारी सकाळी बुरखाधारी दहशतवाद्यांनी एका पोलिस ठाण्यावर हल्ला करून कॉन्स्टेबलची हत्या केली. बंदूकही पळवली. ठाण्याचे दार वाजवल्यानंतर साकिब माेहिउद्दीन यांनी ते उघडताच त्यांच्यावर गोळी झाडली व सर्वजण नंतर पसार झाले.

गोळीबारात तीन वर्षांत १०९ लोकांचा मृत्यू
जम्मू : गेल्या तीन वर्षांत सीमेवर झालेल्या गोळीबारात सुमारे १०९ लोक मारले गेले आहेत. ५०५ जखमी झाले. माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नावर सरकारने ही माहिती दिली.

रविवारी दुपारी 12 वाजून 10 मिनिटांवर पाकिस्तानी लष्कराचे हेलिकॉप्टर पूंछ जिल्ह्यात दिसून आले.

  • Pakistani helicopter violates Indian airspace in Poonch sector

Post a comment

 
Top