0
  • औरंगाबाद - शहराच्या हर्सूल भागातील फातेमानगरात प्लॉटिंग एजंटची 15 ते 20 जणांच्या टोळक्याने तलवार, चाकू, रॉड आणि काठीने हल्ला करून निर्घृण हत्या केली. हे हत्याकांड रविवारी ( 14 ऑक्टोबर) दुपारी साडे चारच्या सुमारास घडले. मोईन महेमूद पठाण (वय 35, रा. हर्सूल, जामा मशीदजवळ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. जमावाने लाकडी दांड्याने आणि तलवारीने मोईनवर हल्ला चढवल्याचे नातेवाइकांचा आरोप आहे. मृत मोईन यांचा भाचा इरफान शेख रहीम याने याप्रकरणी फिर्याद दिली असूल 15 ते 20 जणांच्या जमावावर हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

    असे आहे प्रकरण
    व्हॉट्सअॅपवर मेसेज टाकल्याच्या रागातून प्लॉटिंग एजंट असलेल्या मोईन पठाणवर 15 ते 20 जणांच्या जमावाने तलवार, चाकू, रॉड तसेच लाठीने हल्ला करून दिवसाढवळ्या भरचौकात निर्घृण हत्या केली. यात मृत मोईन यांचा भाचाही गंभीर जखमी झाला. ही खळबळजनक घटना रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास हर्सूल येथील फातेमानगर चौकात घडली. घटनेनंतर फातेमानगर आणि घाटी रुग्णालयात मोठा जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता.
    हर्सूल पोलिसांच्या माहितीनुसार, मोईन पठाण हा हर्सूल येथे प्लॉटिंग, जमीन खरेदी-विक्री व्यवहारात एजंट म्हणून काम करत होता. गावातील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शेखलाल रसूल पटेल, रफिक रसूल पटेल, शोएब सलीम पटेल तसेच इतर काही जणांचा त्याला विरोध होता.
    व्हॉट्सअॅपवरील मेसेजचा राग
    दरम्यान, 4 दिवसांपूर्वी मोईनने एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकलेल्या मेसेजमध्ये काही जणांचा 'कुत्रे' असा उल्लेख केला. हा मेसेज वाचून मारेकऱ्यांपैकी काही जणांनी त्यांना दम असेल तर नाव घेऊन मेसेज टाक, असे धमकावले होते. यावर वेळ आल्यावर कुत्र्यांची नावेही जाहीर करून त्यांच्यासमोरही येईन, असे प्रत्युत्तर त्याने दिले होते. त्यातून 4 दिवसांपासून मारेकरी आणि मोईन यांच्यात वाद सुरू होता. रविवारी सायंकाळी कथित मारेकऱ्यांनी मोईनला गावातील फातेमानगर चौकात बोलावले. अनर्थाची कल्पना मोईनला आली होती. यामुळे त्याने भाच्यालाही फोन करून तेथे यायला सांगितले.
    भरदिवसा झालेल्या हत्याकांडामुळे औरंगाबादेत खळबळ
    फोन आल्यावर मोईन पठाण यांचा भाचा इरफान मित्राला सोडण्यासाठी जात असताना त्याला रस्त्यात सोडून तो फातेमानगर चौकाकडे गेला. तिथे टोळक्याने मोईनला चहुकडून घेरले व वाद घातला. अचानक काहींनी चाकू, तलवार, लाठ्या आणि रॉडने त्यांच्यावर हल्ला चढवला. अनेक वार झाल्याने मोईन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. मदतीसाठी धावलेल्या इरफानच्या डोक्यातही रॉडचा प्रहार करण्यात आला. मोईन घटनास्थळीच बेशुद्ध पडला. त्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी इरफानला आणि अन्य लोकांनी मोईनला घाटीत दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी इरफान याच्या फिर्यादीवरून हर्सूल पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.Plotting Agent Brutally Killed by Mob of 15 to 20 For controversial Whatsapp group Message In Aurangabad Harsul

Post a Comment

 
Top