0
शिर्डी - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिर्डीतील साईबाबा समाधी शताब्दी वर्ष सोहळ्याची सांगता करण्यात आली आहे. त्याआधी पंतप्रधानांनी साईबाबांचे दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते साईबाबांची धूपआरती करण्यात आली. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात मोदींच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात 10 लाभार्थ्यांना घरकुलाचे वाटप करण्यात आले. त्यांना घराची किल्ली आणि गृहप्रवेशाचे साहित्य देण्यात आले. त्यानंतर विविध जिल्ह्यांमध्ये ई गृहप्रवेश करण्यात आला. यावेळी मोदींनी लाभार्थ्यांशी कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. अनेकांशी मोदी मराठीतून बोलले.

मोदी म्हणाले, कसं काय.. नव्या घरात मिठाई बनवली का..
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ई गृहप्रवेशादरम्यान मोदींनी लाभार्थ्यांशी कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. अनेकांशी मोदी मराठीतून बोलले. यावेळी बोलताना मोदींनी लाभार्थ्यांना विचारले.. कसं काय.. काय चाललंय.. नवं घर कसं आहे.. नव्या घरामध्ये मिठाई तयार केली की, नाही.. मला मिठाई खायला कधी बोलावणार.. मोदींनी असे विचारल्यानंतर नंदुरबार येथील एका महिलेने तुम्ही नंदुरबारला या असे आमंत्रण दिले.
भाषणांत काय म्हणाले मोदी..
> मोदींनी सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या. 
> दरवर्षी लोकांच्या मध्ये जाऊन उत्सव साजरा करण्याची माझी इच्छा असते, त्यामुळेच मी आज येथे आलो आहे. मला लोकांकडून ऊर्जा मिळते. 
> काही वेळापूर्वीच मला साईबाबांचा आशीर्वाद घेण्याचे भाग्य लाभले. 
> सबका मालिक एक हा साईंचा मंत्र आहे..साईबाबा सर्व समाजाचे होते आणि समाजही साईबाबांचा होता..
> गरीबांसाठी काम करण्यासाठी साईच्या चरणांशिवाय दुसरी चांगली जागा नाही.
काय म्हणाले फडणवीस..
- महाराष्ट्राला आणखी 6 लाख घरांची आवश्यकता ती मिळाल्यास ऑक्टोबर 2019 पूर्वीच महाराष्ट्रातील सर्व बेघरांना घरे दिली जातील. 
- महाराष्ट्रात मोठा दुष्काळ समोर दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आमच्या पाठिशी उभे राहील याचा मला विश्वास आहे. 
- नगरच्या उड्डाण पुलांसाठी 50 कोटींची घोषणा. 
- आजवर गरीबी हटावच्या फक्त घोषणा देण्यात आल्या. पण खऱ्या अर्थाने गरीबी मिटवण्याचे काम फक्त नरेंद्र मोदींनीच केले.
पंकजा मुंडे..
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला बेघरमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आज अडिच लाख घरांचे वाटप केले जाणार असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.
UPDATES
सकाळी 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी विमानतळावर दाखल
> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केले मोदींचे स्वागत
> साडे दहाच्या दरम्यान मोदी साई बाबा मंदिरात दाखल
> पंतप्रधानांनी घेतले साईबाबांचे दर्शन.. मोदींच्या हस्ते साईबाबांची धूपआरती
> मंदिरातील भाविकांच्या विनंतीवरून मोदींनी त्यांच्याबरोबर फोटो काढून घेतले.
> मंदिरातील पुजेनंतर मोदींनी ध्वज उतरवून शताब्दी सोहळ्याची सांगता केली.
> पंतप्रधान मोदी सभा स्थळाकडे रवाना
> सभा स्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना घरांचे वाटप होणार.
> पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते शिर्डी संस्थानच्या विविध विकास कामांचा डिजिटल शुभारंभ.
पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी कडक सुरक्षा 
पंतप्रधानांच्या शिर्डी दौऱ्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना केल्या आहेत. ९ अतिरिक्त पोलिस अधीक्षक, १५० सहायक उपनिरीक्षक, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या, दहशतविरोधी पथकाच्या चार टीम, बॉम्बशोधक पथकाच्या ९ पथके, शीघ्र कृतिदलाची ८ पथके, दंगल नियंत्रण पथकाची ६ पथके, व्हिडिओ कॅमेरे व ड्रोनची नजर असणार आहे.
अनुराधा पौडवाल यांची भजनसंध्या
उत्सवाच्या सांगता दिवशी शुक्रवारी सायंकाळी ६.१५ वाजता श्रींची धुपारती, रात्री ७.३० ते १०.१५ या वेळेत प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा भजनसंध्या कार्यक्रम असून रात्री १०.३० वाजता शेजारती होईल.
गुरुवारी श्री साईसच्चरित्र या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. त्यानंतर साईबाबांची प्रतिमा आणि श्री साईसच्चरिताची मिरवणूक काढण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उदय ललित व गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी या मिरवणूकीस आणि भिक्षा झोळी कार्यक्रमास हजेरी लावली. सकाळी १०.०० वाजता विवेक गोखले (नृसिंहवाडी) यांचे कीर्तन झाले. दुपारी १२.३० वाजता श्रींची मध्यान्ह आरती झाली. सायंकाळी ५.०० वाजता खंडोबा मंदिर येथे सीमोल्लंघन करण्यात आले. सायंकाळी ६.१५ वाजता श्रींची धुपारती झाली.
रात्री ७.३० ते १०.३० या वेळेत प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे आणि राहुल देशपांडे यांच्या भजनसंध्या कार्यक्रमाला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. रात्री ९.१५ वाजता श्री साईबाबांच्या रथाची शिर्डी शहरातून मिरवणूक काढण्यात आली. या रथ मिरवणुकीत स्थानिक भजनी मंडळ, झांजपथक, लेझीम पथक, बॅण्ड पथक तसेच ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाली होते.

समाधी शताब्दी सोहळा साईनामाच्या जयघोषात निघाली भव्य मिरवणूक, भाविकांचा उत्साह शिगेला

  • News and Updates pm narendra modi in shirdi Today

Post a Comment

 
Top