0
 • नागपूर - पाकिस्तान व अमेरिकेसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून ब्रह्मोस एरोस्पेसच्या नागपूर युनिटमधील निशांत अग्रवाल या अभियंत्याला सोमवारी अटक करण्यात आली. तो सीनियर सिस्टिम इंजिनिअर आहे. तो हनी ट्रॅपमध्ये फसून हेरगिरी करत होता. उत्तर प्रदेश व महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई केली. त्याने सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेत्रणास्त्रांची संवेदनशील गोपनीय माहिती पाकची गुप्तहेर संस्था आयएसआय व अमेरिकेच्या गुप्तहेर संघटनेलाही पुरवल्याचा आरोप आहे. यूपी एटीएसचे पोलिस महानिरीक्षक असीम अरुण यांनी सांगितले की, निशांतकडून जप्त लॅपटाॅपमध्ये क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाशी निगडित माहिती व दस्तऐवज मिळाले आहेत. संयुक्त पथकांनी निशांतच्या रुडकी येथील घर, ब्रह्मोसचे नागपूर युनिट आणि नागपुरातील घरी झडती घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. एटीएसने कानपूर व आग्रा येथूनही दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या दोघांच्या लॅपटॉपमध्ये संवेदनशील माहिती आढळल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

  मार्चमध्येच झाले होते लग्न 
  नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी 'दिव्य मराठी'ला सांगितले की, या संयुक्त कारवाईत नागपूर पोलिसांची फारशी भूमिका नव्हती. या पथकांनी मागितलेली जुजबी मदत तेवढी त्यांना पुरविण्यात आली आहे. प्रकरण संवेदनशील असल्याने कारवाईचे डिटेल्सही या पथकांनी शेअर केलेले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. निशांत हा नागपुरातील उज्वलनगर भागातील मनोहर काळे यांच्या घरी किरायाने रहातो. मार्चमध्येच त्याचे लग्न झाले होते. घर परिसरातही एटीएसच्या पथकांकडून तपासणीचे काम बराच वेळ सुरू होते.
  युवा वैज्ञानिक पुरस्काराने गौरव 
  निशांत हा उत्तराखंडमधील रुरकी येथील रहिवासी आहे. तो कुरुक्षेत्रच्या एनआयटीचा पासआऊट आहे. तो ब्रह्मोस मिसाइल युनिटमध्ये चार वर्षांपासून काम करत होता. हायड्रॉलिक-न्यूमेटिक्स आणि वॉरहेड इंटिग्रेशन विभागाच्या ४० लोकांच्या चमूचे नेतृत्व करत हाेता. २०१७-१८ मध्ये युनिटने त्याचा युवा वैज्ञानिकाच्या पुरस्कारानेही गौरव केला होता. ब्रह्मोसच्या सीएसआर, आरअँडडी ग्रुपचाही सदस्य आहे. सध्या ब्रह्मोस नागपूर व पिलानी साइट्सचे प्रोजेक्ट्स पाहत होता.
  पाक एजंटच्या चौकशीतून सुगावा 
  यूपी एटीएसने काही महिन्यांपूर्वी आयएसआय एजंटाला ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीतून निशांत अग्रवालचे नाव समोर आले. मिलिटरी इंटेलिजन्सला याबाबतची माहिती देण्यात आली. यानंतर यूपी एटीएस व मिलिटरी इंटेलिजन्सच्या पथकांनी त्याची माहिती जमवणे सुरू केले होते.

  असे आहे ब्रह्मोस : सुपरसॉनिक ब्रह्मोस हे उच्च मारक क्षमतेचे क्षेपणास्त्र आहे. चीनसारख्या प्रगत देशांकडेही असे तंत्रज्ञान नाही, असे मानले जाते. ब्रह्मोस हा भारताच्या डीआरडीओ व रशियाच्या एनपीओएमचा संयुक्त उपक्रम आहे. गतवर्षी निशांतच्याच युनिटने मिसाइल सिस्टिमच्या अत्याधुनिक आवृत्त्यांची चाचणी केली होती. नागपुरात वर्धा मार्गावर ब्रह्मोस एरोस्पेस लिमिटेडचे युनिट आहे.
  फेसबुकवरून पुरवली माहिती 
  निशांत हा फेसबुकवर पाकच्या महिला मित्रांसोबत डीआरडीओची माहिती शेअर करत होता. त्यात ब्रह्मोसच्याही माहितीचा समावेश असल्याचा एटीएसला संशय आहे. ही माहिती पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेला पोहोचवली जात होती.

  काय आहे हनी ट्रॅप : आयएसआयने संवेदनशील माहितीसाठी आजवर अनेकदा हनी ट्रॅपचा वापर केल्याचे आढळून आले आहे. सुंदर तरुणींचे बनावट सोशल मीडिया अकाउंट उघडून त्यावर फ्रेंडशिप करायची. चॅटिंगद्वारे महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना जाळ्यात ओढायचे आणि माहिती काढून घ्यायची, अशी आयएसआयची रणनीती राहिली आहे.
  Nishant Agrawal-ISI Agent was Arrested from Brahmos Missile unit Nagpur|

Post a comment

 
Top