- लखनौ - दिवंगत IPS सुरेंद्र दास यांच्या आत्महत्या प्रकरणाला नवे वळण लागत आहेत. आत्महत्येचा तपास करत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्या कानपूर येथील सील खोलीतून 1 डायरी, 3 पेनड्राइव्ह आणि 2 सीडी सापडल्या आहेत. त्यामुळे, आता पोलिस या प्रकरणाचा सर्वच पैलूंनी नव्याने विचार करत आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, दास यांच्या विधवा डॉ. रवीना यांची पोलिसांनी 60 मिनिटे चौकशी केली. तरीही रवीनाने एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. ती संपूर्ण वेळ फक्त रडत होती. यानंतर पोलिसांनी ती जबाब नोंदवण्याच्या परिस्थितीत नसल्याचे सांगत पुन्हा चौकशीचा निर्णय घेतला.
पुन्हा उघडले सीलबंद सरकारी घर
- पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वात पोलिसांच्या एका टीमने सुरेंद्र दास यांचे कानपूर येथील सीलबंद सरकारी निवास उघडले. याच ठिकाणी सुरेंद्र यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्या खोलीचे बारकाईने निरीक्षण करण्यात आले. तेव्हा पोलिसांना एक डायरी, तीन पेनड्राइव्ह आणि दोन सीडी सापडल्या. यानंतर घर पुन्हा सील करण्यात आले.
- सोबतच पोलिसांनी सुरेंद्र यांचे फुटलेले मोबाईल जोडून आयटी आणि फॉरेन्सिक टीमकडे पाठवला आहे. या टीमकडून फोनमध्ये असलेला डेटा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकदा हा डेटा समोर आला की त्यांनी शेवटच्या क्षणी आणि काही दिवसांपूर्वी कुणाशी काय संवाद साधला याची संपूर्ण माहिती मिळू शकेल.
कुटुंबियांना कंटाळले होते सुरेंद्र?
सुरेंद्र दास यांचे सासरे रावेंद्र सिंह यांनी आपल्या व्याहींवर गंभीर आरोप लावले आहेत. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी प्रेस कॉन्फ्रेंस घेऊन आपले जावई सुरेंद्र यांचे कॉल रेकॉर्डिंग, पत्नी रवीनाला पाठवलेला शेवटचा ई-मेल दाखवला. सुरेंद्र यांचे कुटुंबीय त्यांना कथितरित्या पैसे काढण्याची मशीन समजत होते. नेहमीच त्यांच्याकडून पैश्यांची मागणी करत होते. सुरेंद्र यांनी स्वतः आपल्या पत्नीला ह्या रेकॉर्डिंग दिल्या होत्या. त्याच दबावातून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असे आरोप त्यांच्या सासऱ्यांनी लावले.
4 दिवसानंतर रुग्णालयात झाला मृत्यू
आयपीएस सुरेंद्र दास यांनी 5 सप्टेंबर रोजी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अतिशय गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, उपचार सुरू असताना 4 दिवसांनंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्यापही समोर आले नाही. त्यातच आता डायरी, पेनड्राइव्ह आणि सीडीतून खळबळजनक सत्य समोर येणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. -
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a comment