फगवाडा - खोट्या प्रतिष्ठेच्या नावाखाली आणखी एका हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. पंजाबच्या फगवाडा जिल्ह्यात राहणाऱ्या एका भावाने आपल्या बहिणीच्या प्रियकराचा कोयत्याने गळा चिरून खून केला. काही दिवसांपूर्वीच त्याची बहिण एका युवकासोबत घरातून पळून गेली होती. यानंतर आरोपीने त्याला लग्न लावून देत असल्याच्या बहाण्याने घरी बोलावले. त्यानंतर त्याची निर्घृण हत्या केली.
एटीएमवर गार्ड होता पीडित युवक
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, 26 वर्षीय उमेश कुमार फगवाडा जिल्ह्यातील ओंकार नगर परिसरात एका एटीएमवर गार्डची नोकरी करत होता. गेल्या काही वर्षांपासून याच शहरात राहणाऱ्या मधु (22) हिच्यासोबत त्याचे प्रेम प्रकरण होते. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी कुटुंबियांच्या मंजुरीने विवाहाची इच्छा व्यक्त केली. परंतु, मुलीच्या कुटुंबियांनी यास तीव्र विरोध केला.
2 महिन्यांपूर्वीच परतले होते कपल...
यानंतर उमेश आणि मधुने घर सोडले. त्यांनी कथितरित्या पानीपत येथे जाऊन विवाह केला. सोबतच, मधुने आपल्या मंगळसूत्र आणि बांगळ्यांसह एक फोटो आपल्या कुटुंबियांना देखील पाठवला. गेल्या 2 महिन्यांपासून ते पानीपतमध्ये राहिल्यानंतर 22 सप्टेंबर रोजी पुन्हा शहरात परतले होते. आपली बहिण प्रियकरासह शहरात आल्याची माहिती मधुचा भाऊ अजितला मिळाली होती. त्याने बहिण आणि तिच्या प्रियकराशी फोनवर संवाद साधला. तसेच माफ केल्याचे सांगून तुमचा विवाह लावून देणार असे आश्वस्त केले.
मग घडले असे काही...
उमेश मधुच्या भावाच्या सांगण्यावरून शनिवारी तिच्या घरी गेला. यावेळी अजित आणि उमेशची भेट झाली. परंतु, उमेशचा चेहरा पाहताच अजित संतापला. दोघांमध्ये प्रचंड वाद झाला. उमेशच्या कुटुंबियांनी सांगितल्याप्रमाणे, अजित हत्येच्या तयारीनेच थांबला होता. त्याने वादात उमेशच्या गळ्यावर धारदार कोयत्याने वार केले. या हल्ल्यात उमेशचा जागीच मृत्यू झाला.
पीडित कुटुंबियांनी मधुलाही केले आरोपी
पीडित उमेशच्या कुटुंबियांनी मधुला देखील या घटनेसाठी जबाबदार धरले आहे. सोबतच, आरोपी भाऊ अजित, मुलीचे वडील रमेश कुमार आणि आई कलावती यांच्यासह मधुला सुद्धा आरोपी म्हटले आहे. दरम्यान, या घटनेतील मुख्य आरोपी अजित सध्या फरार असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.-
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment