0
रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे एमआयडीसीतील टी. जे. मरीन प्रॉडक्ट्स कंपनीत शनिवारी कुलींग टॉवरला भीषण आग लागली. कंपनीत आग लागताच व्यवस्थापन व कामगारांची एकच पळापळ उडाली. दुपारच्या सुमारास काळयाकुट्ट धुराचे लोट उसळल्याने परिसरातील नागरिकही भयभीत झाले. मात्र, काहीवेळात या आगीवर नियंत्रण मिळवण्यात कर्मचाऱयांना यश आले. या दुर्घटनेत कंपनीचे लाखोंचे नुकसान झाल्याचे समजते.
कोकण रेल्वे कॉलनी लगत असलेल्या एमआयडीसी परिसरात टि.जे.मरीन ही कंपनी आहे. या कंपनीत मत्स्य प्रक्रिया केली जाते. माशांपासून तेल व भुकटीची निर्मिती कंपनीत होते. शनिवारी दुपारी 12.15च्या सुमारास कंपनीतील कुलींग टॉवरला अचानक आग लागली. काहीवेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने कर्मचाऱयांची पाचावर धारण बसली. भयभीत झालेल्या कामगारांनी तातडीने कंपनीबाहेर धाव घेतली. आगीच्या धुराचे लोट कंपनीतून बाहेर पडू लागले. त्यामुळे परिसरातील अनेक नागरिकांनीही कंपनीकडे धाव घेतली.
आग आटोक्यात आणण्यासाठी कंपनीतील कर्मचाऱयांनी आटोकाट प्रयत्न केले. पण आगीवर नियंत्रण राखणे आवाक्याबाहेरची बाब होती. तत्काळ नगर परिषदेच्या अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, अग्निशमन बंब पोहचण्यापूर्वीच या आगीवर नियंत्रण मिळवण्यात कंपनी कर्मचाऱयांना यश आले. त्यामुळे साऱयांनीच सुटकेचा निःश्वास टाकला.
या आगीत कंपनीचा कुलींग टॉवर जळून खाक झाल्याने लाखों रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. कंपनीत अग्नीरोधक यंत्रणा नसल्याने आग वाढत गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जर आगीवर वेळीच नियंत्रण ठेवले गेले नसते तर मोठी हानी झाली असती.

Post a Comment

 
Top