0
 • Congress will get rid of both the coalition: Chandrakant Patilमुंबई - मुख्यमंत्री हा आमदारांच्या संख्येवर ठरत असतो. शिवसेनेने आधी युती तर करावी. त्यानंतर ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री या सूत्रानुसार शिवसेनेचे आमदार अधिक असतील तर मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल. शिवसेना भाजपसोबत आली तर दोन्ही काँग्रेसचा आगामी निवडणुकांत धुव्वा उडेल. गेल्या चार वर्षांत वेगळे लढूनही भाजपने सर्व निवडणुकांमध्ये चांगले यश मिळवले आहे. तसेच शिवसेनेनेही अनेक निवडणुकांमध्ये यश मिळवले आहे. मात्र, आता काँग्रेसला मदत होईल, असे शिवसेनेने न वागता युती करावी, असे आवाहन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.


  पाटील म्हणाले, मुंबई महापालिकेसह ठाणे, मीरा-भाईंदर,कोल्हापूर आदी निवडणुकांच्या आकडेवारीत भाजप आणि शिवसेना आघाडीवर असल्याचे दिसून आले असून गेल्या चार वर्षांत झालेल्या निवडणुकांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले तर हेच दिसून येते. जर भाजप आणि शिवसेना एकत्र येऊन लढले तर समोर कोणी उरणारच नाही. यासाठी आता शिवसेनेने विचार करण्याची गरज असून आहे. काँग्रेसला मदत होईल असे न वागता राज्यातल्या जनतेच्या हिताचा विचार शिवसेनेने करावा. काँग्रेसची पंधरा वर्षांची राजवट योग्य होती, असे शिवसेनेला वाटते का? असा प्रश्नही या वेळी त्यांनी उपस्थित केला.

  लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेने ४२ जागा जिंकलेल्या आहेतच. उरलेल्या सहा जागांच्या वाटपाचा प्रश्न एका चहाच्या चर्चेत संपेल आणि या सहा जागाही आम्ही जिंकू. तसेच विधानसभेलाही आमच्या दोघांच्या मिळून १८५ जागा आहेत. एकत्र आलो तर आणखीन १५ ते २० जागा सहज मिळवू, असेही पाटील म्हणाले.

  दुष्काळावर विरोधकांनी सुरू केलेल्या आरोपांबाबत पाटील म्हणाले, ऑक्टोबरअखेरीस आणेवारीचे आकडे आले तरी प्रत्यक्ष जानेवारीत जीआर काढायचे आणि त्यानंतर केंद्राचे पथक राज्यात यायचे, असा प्रघात पाडणाऱ्यांना ऑक्टोबर महिन्यात प्रत्यक्ष दुष्काळाचा जीआर काढून त्यात टंचाई असा शब्द न वापरता दुष्काळ हा शब्द टाकलेला रुचलेला दिसत नाही. पण, हे सरकार शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत देत आहे. त्यामुळे विरोधक खोटा प्रचार करत असल्याचे पाटील त्यांनी दिव्य मराठीशी या वेळी बोलताना सांगितले.

  आमच्या प्रामाणिक प्रयत्न : केवळ शब्दच्छल करण्यात अर्थ नाही. आपले २०११, २०१२ चे दुष्काळाचे जीआर त्यांना कदाचित आता आठवत नसतील. २०११ च्या दुष्काळाचा जीआर ३ जानेवारी २०१२ मध्ये निघाला आणि त्यात टंचाईसदृश असाच उल्लेख होता. २०१२ च्या दुष्काळाच्या जीआरमध्येसुद्धा टंचाई हाच उल्लेख होता. त्या वेळी गाव हा घटक होता. २०११ च्या दुष्काळात ६२०१ गावे, तर २०१२ च्या दुष्काळात ३३५६ गावे समाविष्ट होती. आता आमच्या सरकारने १८० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला.

  त्यात संपूर्ण गावे समाविष्ट आहेत. जलयुक्त शिवारसारख्या योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे, हा तर महाराष्ट्रातील तमाम घाम गाळणाऱ्या शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा अपमान असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी या वेळी बोलताना सांगितले. दरम्यान, पाटील यांनी अवाहन केल्यानंतर आता शिवसेना याला कसा प्रतिसाद देते हे पाहणे औत्सुक्याचे आहे. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी आपल्या अनेक कार्यक्रमात आता भाजपसाेबत कदापि युती करणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे जशा निवडणुका जवळ येतील तसे भाजप आणि शिवसेनेतील संबंधाचे चित्र स्पष्ट होईल.
  धरणांबाबत अजितदादांनी उत्तर द्यावे 
  ज्या सरकारने चार हजार कोटींची कर्जमाफी दिली त्यांनी २१,५०० कोटींच्या कर्जमाफीवर प्रश्न उपस्थित करायचे. ज्यांनी १५ वर्षांत केवळ ७६०० कोटी रुपये पीक विम्याचे दिले त्यांनी अवघ्या चार वर्षांत १२ हजार कोटी रुपये देणाऱ्या पीक विम्यावर प्रश्न उपस्थित करायचे. भारनियमनाची पद्धत रूढ करणाऱ्यांनी राज्य भारनियमनमुक्त करणाऱ्यांवर प्रश्न उपस्थित करायचे हा प्रकार म्हणजे, ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असाच आहे. धरणांची स्थिती बिकट कुणामुळे झाली, याचे उत्तर सन्माननीय अजितदादा अधिक चांगल्या प्रकारे देऊ शकतात, असा टोलाही
  चंद्रकांत पाटील यांनी या वेळी लगावला

Post a Comment

 
Top