सोलापूर- महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी अक्कलकोट रोड एमआयडीसी येथील एका गोदामातून २५ टनांपेक्षा जास्त प्लास्टिक जप्त केले. शहरातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. वासुदेव रामस्वामी नल्ला यांच्या गोदामात हा साठा होता, असे महापालिका उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी सांगितले.
बंदी असतानाही प्लास्टिकचा साठा केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी छापा मारून प्लास्टिक जप्त करण्यात आले. त्यात सर्व प्रकारचे प्लास्टिक आहे. २५ ते ३० टन साठा असल्यामुळे उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नवनाथ अवताडे यांनी गोदामाला टाळे ठोकले. जवळपास ३० लाखांचे प्लास्टिक जप्त करण्यात आले. मात्र नल्ला यांना फक्त पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. जप्त केलेले प्लास्टिक आणण्यासाठी मंगळवारी रात्री वाहन उपलब्ध झाले नाही, त्यामुळे गोदाम सील करण्यात आले. बुधवारी हे प्लास्टिक ताब्यात घेेणार असल्याची माहिती ढेंगळे-पाटील यांनी दिली. या पथकामध्ये ए .ए. आराध्ये, महादेव शेरखाने, श्रीराम कुलकर्णी, केदार गोटे, सूर्यकांत लोखंडे यांचा समावेश होता.
Post a Comment