0

सत्ता मिळाल्यास रोजगार निर्मिती करू असे आश्वासन भाजप सरकारने दिले होते. परंतु त्यांनी उलटे केले.

 • NCP's Soft Hindutva
  औरंगाबाद- गुजरातनंतर मध्य प्रदेशात काँग्रेसने राहुल गांधी शिवभक्त असल्याचे पोस्टर्स लावून पक्ष सॉफ्ट हिंदुत्वाकडे झुकल्याचे स्पष्ट केले. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचाही सूर सॉफ्ट हिंदुत्वाकडे वळल्याचे मंगळवारी ( ९ ऑक्टोबर) संविधान बचाव मेळाव्यात दिसले. एवढेच नव्हे तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वपित्री अमावास्येनिमित्त गुलमंडी येथील सुपारी हनुमान मारुती मंदिरात दर्शनही घेतले.

  दरम्यान, मेळाव्यात पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडले. दुष्काळ जाहीर करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही अन् म्हणे २०१९ नंतरही मीच मुख्यमंत्री अशी स्वप्ने फडणवीस पाहत आहेत, असे ते म्हणाले.

  सिडकोतील संत तुकोबाराय नाट्यगृहात झालेल्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष, माजी राज्यमंत्री फौजिया खान यांनी तयार केलेली एक चित्रफीत दाखवण्यात आली. तिचा प्रारंभच राम-सीतेच्या प्रतिमेने होता. हिंदू धर्मामध्ये महत्त्वपूर्ण मानल्या गेलेल्या बनारस येथील घाट दाखवण्यात आला. भारतमाता आणि संविधान यामधील संवाद सादर करण्यात आला. केवळ संविधानामुळेच भारतमाता अखंड राहू शकते, असा संदेश देण्यात आला होता. शिवाय मोदींमुळे अघोषित आणीबाणी सुरू असल्याचेही दाखवण्यात आले. या वेळी माजी मंत्री राजेश टोपे, फौजिया खान, आमदार सतीश चव्हाण, विक्रम काळे तसेच महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आदी उपस्थित होते.

  सत्ता द्या, अडीच लाखांची नोकरभरती 
  सत्ता मिळाल्यास रोजगार निर्मिती करू असे आश्वासन भाजप सरकारने दिले होते. परंतु त्यांनी उलटे केले. उद्योग बंद पडल्याने अनेकांच्या माथी बेरोजगारी आली आहे. विविध खात्यांत अडीच लाख पदे रिक्त आहेत. तुम्ही मला सत्ता द्या, मी अडील लाख पदे भरतो. सत्ता हाती आल्यानंतर ही पदे भरले नाही तर मी नावाचा अजित पवार नाही, असेही पवार म्हणाले.

  कडक कायद्यांना आमचा पाठिंबा 
  देश व राज्यात महिला सुरक्षित नसल्याचे सांगत पवार म्हणाले की, मंत्रीच बलात्कार करत आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या एका कार्यक्रमात सुरक्षेच्या कारणावरून महिलांची अंतर्वस्त्रे तपासण्यात आली. खरे तर महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी सरकारने आणखी कडक कायदे केले तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ.

  सत्ताधारी आमदार मुली पळवून नेण्याची भाषा करतो तरी मुख्यमंत्री गप्प कसे बसतात?- सुप्रिया 
  एक सत्ताधारी आमदार मुली पळवून नेण्याची भाषा करतो. पण राज्याचे गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री गप्प का बसतात, असा प्रश्न सुप्रिया यांनी उपस्थित केला. दिल्लीत संविधानाची प्रत जाळली जात असताना मोदी दिल्लीतच होते. त्यांनीही त्या घटनेकडे दुर्लक्ष केले. भाजपला लोकसभा, राज्यसभेत बहुमत मिळाले की ते संविधान बदलण्यास सुरुवात करतील, असे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले.

  हेक्टरी ५० हजारांची मदत द्या 
  पवार म्हणाले की, मराठवाड्यातील ५० तालुक्यांत दुष्काळ आहे. शेतकऱ्यांना हरभरे, तूरडाळीचे पैसे मिळालेले नाहीत. दुसरीकडे फडणवीस २०१९नंतर मीच मुख्यमंत्री होणार असे स्वप्नरंजन करत आहेत. त्यांनी आधी जागे होऊन दुष्काळ जाहीर करावा. हेक्टरी ५० हजारांची मदत तातडीने द्यावी.

Post a Comment

 
Top