0
कोल्हापूर : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी सर्व्हिस रोड नाही. स्थानिक नागरिकांची वर्दळ थेट महामार्गावरूनच सुरू असते. यातच विरुद्ध दिशेने जाणारे वाहनधारक आणि बेशिस्त वाहने चालविणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यातून महामार्गावर अपघातांची संख्या वाढली आहे. महामार्गाचे रुंदीकरण करताना सर्व्हिस रोड तयार करावेत, अशी मागणी वाहनधारकांची आहे. महामार्गालगत सर्वत्र सर्व्हिस रोड सुस्थितीत असते, तर कदाचित सोमवारी पहाटे सांगलीतील कॉलेज तरुणांचा झालेला अपघात टळला असता, अशी चर्चा सध्या सुरू आहे. 

पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम होऊन पंधरा वर्षे उलटली. या महामार्गाने वाहतूक गतिमान केली. मात्र, महामार्गावर आवश्यक सुविधा अद्याप दिलेल्या नाहीत. विशेषत: पुणे ते कागल यांदरम्यान महामार्गावरील प्रवास म्हणजे शिक्षा ठरावी इतपत गैरसोयी आहेत. संपूर्ण महामार्गाला दोन्ही बाजुंनी सर्व्हिस रोड असावा असा नियम आहे. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी सर्व्हिस रोड तयारच केले गेले नाहीत. कराड ते कागल यांदरम्यान कंत्राटदाराने अगदीच कमी ठिकाणी सर्व्हिस रोड तयार केले. काही ठिकाणी सलग चार ते पाच किलोमीटर अंतरातही सर्व्हिस रोड नाहीत. जे आहेत त्यांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी मध्येच काम थांबलेले सर्व्हिस रोड बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांची वर्दळ महामार्गावरून सुरू असते. 

कागलपासून कोल्हापूरपर्यंत महामार्गाच्या दुतर्फा काही ठिकाणी तुटक स्थितीत सर्व्हिस रोड आहेत. गोकुळ शिरगाव आणि उजळाईवाडी परिसरात भुयारी मार्गांना जोडणारे सर्व्हिस रोड आहेत. मात्र हे रोड वाहतुकीऐवजी वाहनांच्या पार्किंगसाठीच वापरले जातात. महामार्गालगतच्या बहुतांश हॉटेल्सचे पार्किंग सर्व्हिस रोडवर असते. त्यामुळे दुचाकी आणि हलक्या वाहनांना वाहतुकीसाठी जागाच मिळत नाही. 

पसरिचानगर ते उजळाईवाडीदरम्यान सर्व्हिस रोड नसल्याने महामार्गावर मोठी वर्दळ असते. विशेष म्हणजे या परिसरात उलट्या दिशेने होणारी वाहतूकही मोठी आहे. उचगाव नाका ते रेल्वे लाइन परिसरात सर्व्हिस रोड असूनही पार्किंगमुळे तो वापरात येत नाही. सांगली फाटा ते शिये फाटा या परिसरात दोन्ही बाजुला सर्व्हिस रोड आहेत, परंतु एमआयडीसीमुळे सर्व्हिस रोडवर वाहनांची गर्दी असल्याने स्थानिकांची ये-जा महामार्गावरून सुरू असते. 

पुढे शिये फाटा ते टोप यांदरम्यान सर्व्हिस रोड नाहीत. टोप ते अंबप फाट्यादरम्यान केवळ महामार्गाच्या पश्चिमेला सर्व्हिस रोड आहे. पूर्वेला सर्व्हिस रोड तयारच केला गेला नाही. वाठार ते कराड यांदरम्यान केवळ भुयारी मार्गांना जोडणारे सर्व्हिस रोड आहेत. विशेष म्हणजे महामार्ग प्राधिकरणाचे याकडे लक्षच नाही. जिथे सर्व्हिस रोड तयारच नाही, तिथेच सर्व्हिस रोडचा वापर करा, असे फलक लावले आहेत. सलग सर्व्हिस रोडचा अभाव असल्याने दुचाकी आणि स्थानिकांची हलकी वाहने महामार्गावरच असतात. सलग आणि दर्जेदार सर्व्हिस रोड तयार केल्यास महामार्गावरील वाहतुकीला अडथळे निर्माण होणार नाहीत. यातून अपघात टाळता येतील, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. किमान महामार्ग रुंदीकरणात तरी सर्व्हिस रोडचे काम प्राधान्याने करावे, अशी मागणी वाहनधारकांची आहे. धोकादायक ऊसवाहतूक 


कोल्हापूर ते कराड यांदरम्यान महामार्गावरून ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. सर्व्हिस रोड नसल्याने ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाड्या आणि ट्रॅक्टर महामार्गावरूनच जातात. कागल परिसरात तर उसाच्या वाहनांची धोकादायक उलटी वाहतूक सुरू असते. कागलजवळ चार वर्षांपूर्वी उलटी वाहतूक करणाऱ्या बैलगाडीला ट्रकने समोरून धडक दिली होती. त्या अपघातात बैलासह ऊसतोड मजूरही ठार झाला होता. सर्व्हिस रोड असते, तर असे धोके टाळका आले असते. 

'तो' अपघात सर्व्हिस रोड नसल्यानेच 
नागाव फाट्यानजिक सोमवारी (ता. १९ फेब्रुवारी) पहाटे शिवज्योत घेऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ट्रकला भीषण अपघात होऊन सहा विद्यार्थी ठार झाले. सर्व्हिस रोड नसल्यानेच तो अपघात घडल्याचे वास्तव घटनास्थळी दिसते. वाठारपासून सलग सांगली फाट्यापर्यंत सर्व्हिस रोड असता, तर वालचंद कॉलेजच्या मुलांनी सर्व्हिस रोडवरून ज्योत आणली असती. सर्व्हिस रोड नसल्याने सहा मुलांना जीव गमवावा लागला. 

Post a Comment

 
Top