0
मराठा आरक्षणासाठी यापुढे राज्य सरकारला अधिक मुदत देणे शक्य नाही, असा ठाम निर्धार राज्यभरातील मराठा समाज आंदोलकांनी सोमवारी कोपरखैरणे येथील राज्यस्तरीय समन्वयक बैठकीमध्ये व्यक्त केला. येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत सरकारने मराठा समाजाच्या विविध मागण्या मान्य न केल्यास 26 नोव्हेंबरनंतर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही मराठा क्रांती मोर्चाने या बैठकीत दिला.कोपरखैरणेच्या लोहणा समाज सभागृहामध्ये सोमवारी दिवसभर चाललेल्या बैठकीत नवीन 25 सदस्यांची कोअर कमिटी जाहीर करण्यात आली. ही समिती राज्यभरातील समन्वयक समित्यांना पुढील दिशा स्पष्ट करणार आहे.  आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे, शेतकर्‍यांची कर्ज माफी, कोपर्डी खटला जलदगती न्यायालयात चालवणे, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करणे, राज्यात त्वरित दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे आदी मागण्यांवर बैठकीत भर देण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाच्या नावाने पक्ष आणि संघटना सुरू करण्याचे पेव फुटले असून याला कुठल्याही प्रकारे मराठा समाज बळी पडणार नाही, असा ठरावदेखील या बैठकीत करण्यात आला आहे.

Post a Comment

 
Top