0
किरकोळ वादातून एकाला मारहाण करून पाण्यात बुडवून खून करण्यात आला. अमित प्रदीप भिंगारदेवे (22, रा. नेहरूनगर, विटा) असे मृत युवकाचे नाव आहे. संशयित लक्ष्मण आण्णा चौगुले (21, रा. वडरवस्ती, विटा) शुक्रवार, 26 ऑक्टोबर रोजी विटा पोलिसात हजर झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना गुरूवार, 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी येथील घुमटमाळ-घाडगेवाडी रस्त्यावरील ओढय़ाजवळ घडली. या प्रकरणी पोलीस नाईक प्रदीप संकपाळ यांनी फिर्याद दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, गुरूवार 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शहरातील मध्यवस्तीत असणाऱया दारूच्या दुकानात अमित भिंगारदेवे आणि संशयित लक्ष्मण चौगुले यांच्यात दारूची बाटली फुटल्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर काही वेळाने संशयित चौगुले हा दुचाकीवरून घरी जात असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ अमित भिंगारदेवे याने थांबवून मारहाण केल्याचे संशयित चौगुले याने दिलेल्या जबाबत म्हंटल्याचे पोलिसांनी सांगितले.
यावेळी संशयित चौगुले याने आपल्यातील वाद बाहेर कुठेतरी जावून मिटवूया, असे सांगत, अमित भिंगारदेवे यास दुचाकीवरून घुमटमाळ जवळ असणाऱया ओढय़ात नेले. तेथे गेल्यानंतरही दोघांच्यात वाद झाला. यावेळी संशयीत चौगुले याने मोठा दगड उचलून भिंगारदेवेच्या पाठीत, डोक्यावर आणि हातावर मारला. त्याला ओढय़ातील पाण्यात बुडवून ठार मारले. तो मेल्याची खात्री झाल्यानंतर संशयीत चौगुले घरी गेला. परंतु त्यानंतर भीती वाटू लागल्याने शुक्रवार 26 ऑक्टोबर रोजी चौगुले याने विटा पोलीस ठाण्यात येऊन याबाबत माहिती दिली, असे पोलिसांनी सांगितले.
यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन माने व पोलीस उपनिरीक्षक नानासो सावंत यांच्या पथकाने संशयित आरोपी लक्ष्मण चौगुले यास सोबत घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी अमित भिंगारदेवे याचा मृतदेह ओढय़ात तरंगत असल्याचे दिसून आले. त्याच्या वडिलांनी मृतदेह ओळखला. घटनास्थळाची तपासणी करून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. या गुह्यात संशयित आरोपी लक्ष्मण चौगुले यांच्यासह अन्य साथीदार आहेत का? याचा तपास पोलीस करीत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेची विटा पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मयत अमित भिंगारदेवे याच्या खुनाच्या घटनेने विटा परिसरात खळबळ उडाली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.

Post a Comment

 
Top