- जळगाव- महापालिकेत उमेदवारी देताना काही चुका झाल्याने जामनेरप्रमाणे जळगावात १०० टक्के यश अाले नाही. जळगावातील सर्वच क्षेत्रात ८० टक्के सत्ता भाजपची अाहे. ती १०० टक्के करण्यासाठी येत्या काळात काम करायचे अाहे. जिल्ह्यात अाता शिवसेनेचे तीन अाणि राष्ट्रवादीचा एकच अामदार उरला अाहे. काँग्रेस संपलेलीच असल्याने त्यांचा विषयच नाही; परंतु येत्या निवडणुकीत शिवसेना अाणि राष्ट्रवादीच्या अामदारांचे नाव घेत त्यापैकी एकही अामदार निवडून येऊ देणार नाही, असा दावा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी भाजपच्या बैठकीत केला.
भाजपचे प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील संघटनात्मक बैठक बुधवारी बालाणी रिसाॅट येथे झाली. व्यासपीठावर महापाैर सीमा भाेळे, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील, अामदार सुरेश भाेळे, अामदार चंदुलाल पटेल, अामदार स्मिता वाघ, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, प्रा. डाॅ.अस्मिता पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा संघटनात्मक कार्यक्रम जाहीर करताना मंत्री महाजन यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या, नगरपालिका, लाेकसभा मतदारसंघ अाणि विधानसभा क्षेत्रात भाजपची ८० टक्के सत्ता अाहे. ही सत्ता १०० टक्के करण्यासाठी उर्वरित २० टक्क्यांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले. नगरपालिकेतील १०० टक्के विजयाचा प्रयत्न जळगावमध्ये कमी पडला. परंतु, जामनेरनंतर अाता शेंदुर्णीमध्ये १०० टक्के सत्ता येईल. नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांना अशक्य वाटत हाेतं; परंतु ५० च्या खाली अाले तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची पैज लावली हाेती, असेही मंत्री महाजन म्हणाले. शिवसेनेचे अामदार गुलाबराव पाटील, चंद्रकांत साेनवणे, किशाेर पाटील तर राष्ट्रवादीचे अामदार डाॅ.सतीश पाटील यांची ही शेवटची टर्म अाहे. ते यापुढे निवडून येणार नाही असा दावादेखील त्यांनी केला.
माजी जिल्हाध्यक्षांचे वाॅकअाऊट
पक्षाची बैठक गाेपनीय असल्याचे सांगत जिल्हाध्यक्ष उदय वाघ व जिल्हा परिषद शिक्षण समितीचे सभापती पाेपट भाेळे यांनी निमंत्रण नसलेल्यांनी या बैठकीला बसू नये, अशी विनंती केली. गाेपनियतेचे कारण देत पत्रकारांनादेखील प्रवेश नाकारण्यात अाला. या वेळी पक्षाकडून बैठकीचे निमंत्रण नसल्याने बैठकीत बसलेले माजी अामदार तथा माजी जिल्हाध्यक्ष डाॅ.बी. एस. पाटील हे बैठकीतून उठून गेले. त्यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी निमंत्रण नसल्याने बाहेरचा रस्ता धरला.
पेट्राेल, डिझेल काय घेऊन बसले, इतर १०० बाबींवर बाेला
पेट्राेल, डिझेलचे विषय काय घेऊन बसले. इतर १०० सकारात्मक बाबींवर बाेला. महागाईवर बाेलणे हा विराेधकांचा धंदाच अाहे; परंतु अापण यात पडू नये. ही बाब आंतरराष्ट्रीय बाबींवर अवलंबून अाहे. अापण सरकारच्या इतर १०० निर्णयावर बाेलले पाहिजे, असा सल्लाही महाजन यांनी दिला.
विधानसभेत माेठा अावाज माझाच
कार्यक्रमात मंत्री महाजन यांनी जाेरात घाेषणा देऊन भाषणाची सुरुवात करताना विधानसभेत सर्वात माेठा अावाज माझाच असल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांमधून हशा पिकल्यानंतर त्यांनी लागलीच मी तिथला घाेषणा प्रमुख असल्याची पुश्ती जाेडली.
बैठक संपल्यावर अाले संघटनमंत्री, अनेकांची बैठकीकडे फिरवली पाठ
ज्यांच्या उपस्थितीमध्ये बुधवारी दुपारी २ वाजता भाजपची जिल्हा बैठक अायाेजित करण्यात अाली हाेती. ते संघटनमंत्री विजय पुराणिक सायंकाळी ५ वाजता बैठक संपत असताना सभागृहात अाले. त्यांची वाट पाहत अनेक कार्यकर्ते सभागृहाबाहेर थांबून हाेते. भाजपचे माजी खासदार डाॅ. गुणवंतराव सराेदे यांच्या पत्नी शालिनी सराेदे यांचे निधन झाल्याने ही बैठक रद्द करण्याची मागणी कार्यकर्त्यांसह अनेक पदाधिकारी, अामदारांनी केली हाेती. परंतु काही पदाधिकाऱ्यांच्या अाग्रहावरून ही बैठक घेण्यात अाली. त्यामुळे बैठकीबाबत भाजपमध्ये असंताेष हाेता. अनेक अामदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. तर मंत्री गिरीश महाजन हे देखील देखील शेवटच्या ३० मिनिटांमध्ये बैठकीत प्रकटले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment