0
 • Jalgaon's bus driver drowns in Waghurळगाव- वाघूर धरणावर पार्टी करण्यासाठी गेलेल्या जळगावच्या बसचालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली होती. रविवारी सकाळी ८.३० वाजता त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. तर या चालकाच्या सोबतच्या तीन जणांनी भीतीपाेटी जळगावात न येता थेट भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात जाऊन माहिती दिली. रविवारी त्यांचे जबाब घेण्यात आले.


  सचिन नामदेव सपकाळे (वय ३५, रा. कल्याणीनगर, दादावाडी परिसर, जळगाव) असे मृत बसचालकाचे नाव आहे. एस. टी. महामंडळात चालक असलेल्या सपकाळे यांना शनिवारी सकाळी ७ वाजता त्यांचे सहकारी मिलिंद उत्तमराव साळुंखे, प्रदीप माणिक वाघ व विशाल नाना थोरात या तिघांनी फोन करून घरून बोलावून घेतले होते. चौघे वाहक व चालक पदावर नोकरीस आहेत. सपकाळे यांना बोलावल्यानंतर चौघे दोन दुचाकींनी वाघूर धरण परिसरात गेले होते. सपकाळे यांची दुचाकी नवीन बसस्थानक परिसरात उभी केली होती. वाघूूर येथे पोहाेचल्यावर त्यांनी मद्यपान केले. मासे खाल्ले. चौघेजण दिवसभर तेथेच थांबून होते. यानंतर सायंकाळी सपकाळे हे पाण्यात उतरले होते. पोहता येत नसल्यामुळे ते पाण्यात बुडाले. वाघ, साळुंखे व थोरात यांनी त्यांचा शोध घेतला. परंतु, ते मिळून आले नाहीत. रात्री ८ वाजता तिघांनी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात संपर्क साधून माहिती दिली. पोलिसांनी सपकाळे यांच्या घरी माहिती कळवली. सोबत असलेला मित्र बुडाल्यामुळे वाघ, साळुंखे व थोरात यांनी भीतीपाेटी थेट भुसावळ तालुका पोलिस ठाणे गाठले. यानंतर सपकाळेंचे मोठे भाऊ सुधीर, लहान भाऊ किरण यांनी वाघूर येथे जाऊन शोध घेतला. रात्र झाल्याने शोधकार्य थांबले होते. रविवारी सकाळी ८.३० वाजता सपकाळेंचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. सपकाळे यांना पार्टीसाठी घेऊन गेलेले वाघ, साळुुंखे व थोरात हे तिघे रविवारी दिवसभर भुसावळ पोलिस ठाण्यातच थांबून होते. पाेलिसांनी त्यांचे जबाब घेतले.

  भावाच्या सूचना न एेकल्याने अखेर जीवावर बेतले 
  मृत सचिन सपकाळे यांच्या सोबत नोकरीस असलेल्या काही कर्मचाऱ्यांना दारूचे व्यसन जडले होते. त्यांच्या सोबत राहून लहान भाऊ चुकीच्या मार्गाला जाईल, अशी भीती मृत सपकाळे यांचे मोठे भाऊ सुधीर सपकाळे यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे ते नेहमीच लहान भावासह त्याच्या सहकाऱ्यांना सूचना देत होते. त्यांची सोबत सोडण्याचेही सांगत होते. परंतु, अशाच एका घटनेत अखेर सचिन सपकाळे यांना जीव गमवावा लागला. त्यांच्या मृत्यूनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दु:ख व्यक्त करताना त्यांचे मोठे भाऊ सुधीर यांनी या कटू आठवणी बोलून दाखवल्या. 'दारू पिऊ नका, त्याला सोबत घेऊन जाऊ नका' अशा सूचना वारंवार देऊनही लहान भावाच्या मित्रांनी ऐकले नाही. 'अखेर माझ्या भावाचा जीव गेला' अशा शब्दात सुधीर यांनी दु:ख आणि संताप व्यक्त केला. नातेवाईकांनीही रुग्णालयात भेट देऊन अाक्राेश केला.

  दुसऱ्या दिवशी धरणातून बाहेर काढला मृतदेह 
  सपकाळे यांच्या पश्चात आई सुमन, पत्नी भारती, मुलगा कुणाल (वय ८), मुलगी श्रद्धा (वय ३) व दोन भाऊ असा परिवार आहे. बसचालक म्हणून ते नोकरीला होते. त्यांचा मृतदेह मिळून आल्यानंतर कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला. शव विच्छेदन केल्यानंतर दुपारी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जळगाव येथील एस. टी. महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शाेक व्यक्त केला
  .

Post a Comment

 
Top