0
कळंब (उस्मानाबाद ) : दारू पिऊन शिवीगाळ केल्याच्या कारणावरून सासरा, मेहुण्याने शेजारील शेतकऱ्याच्या मदतीने जावयाचा खूनकेल्याची घटना ९ आॅक्टोबर रोजी तालुक्यातील कोठाळवाडी शिवारातील टोकणी पारधीपेढी येथे घडली. याप्रकरणी मयताच्या भावाने रविवारी कळंब पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर तिघांविरूध्द अ‍ॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत आप्पा देवराज काळे (वय ४५) हे तालुक्यातील कोठाळवाडी येथील टोकणी पारधी पेढी येथील सासूरवाडीत रहायला होते. ९ आॅक्टोबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास ते दारू पिऊन शिवीगाळ करीत असल्याने त्यांचा सासरा दिगांबर शामराव शिंदे याने दोरीने त्याचे हात-पाय बांधले व मेहुणा कल्याण दिगंबर शिंदे याने केबलने मारहाण केली. या आवाजाने शेजारील शेतकरी प्रल्हाद गोडगे तेथे आला. त्याने बाजुला पडलेल्या कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारहाण केली. तसेच कल्याणनेही पुन्हा लोखंडी रॉडने आप्पाला मारले व त्यांना तेथेच टाकून सर्वजण निघून गेले. 
दुसऱ्या दिवशी पहाटे चारच्या सुमारास आप्पा मयत झाला, असे समजून दिगांबर व कल्याण याने त्याला ओढत बाजुच्या पिवळीच्या पिकात टाकले. त्यानंतर त्याच दिवशी रात्री नऊ वाजेच्या सुमारास हावरगाव येथील अंबादास जाधव यांच्या बैलगाडीमध्ये मयत आप्पाराव यास ईटकूर ते पारा रोडच्या कडेला नेऊन टाकले.
ही बाब आपणास पारधी पेढीवरील महिलेने सांगितली. तसेच भाऊ मयत झाल्याची माहिती पारधी पेढीवरील परमेश्वर शिंदे याने दिल्याचे मयत आप्पाराव याचा भाऊ उमराव देवराव काळे (वय ५५, रा. शिंदोदा, ता. जि. बीड) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून मयत आप्पाराव यांचा सासरा दिगांबर, मेहुणा कल्याण व शेजारील शेतकरी प्रल्हाद गोडगे या तिघांविरूध्द अ‍ॅट्रॉसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपाधीक्षक डॉ. नितीन कटेकर करीत आहेत.

Post a Comment

 
Top