नवी दिल्ली/गाझियाबाद- गांधी जयंतीलाच दिल्ली- यूपीच्या सीमेवर शेतकरी आणि जवानांत धुमश्चक्री उडाली. कर्जमाफी, पेन्शन व शेतमालाला वाजवी भावासह अनेक मागण्यांसाठी 'किसान क्रांती यात्रा'मध्ये पायी दिल्लीकडे निघालेल्या ३० हजार शेतकऱ्यांना पोलिस-जवानांनी सीमेवरच रोखले. शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स हटवून दिल्लीच्या सीमेत दाखल होण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्यांची धुमश्चक्री उडाली. पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचा मारा तसेच लाठीमारही केला. अश्रुधुराचे गोळे डागले व हवेत गोळीबारही केला.
या संघर्षात एका एसपीसह ७ पोलिस व ३६ शेतकरी जखमी झाले आहेत. ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. शेतकऱ्यांना दिल्लीत घुसण्यापासून रोखण्यासाठी ३ हजारांवर जवान तैनात आहेत. दरम्यान, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शेतकरी प्रतिनिधींची भेट घेऊन मनधरणीचा प्रयत्न केला. मात्र शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे.
महात्मा गांधी म्हणाले होते...
'माझे चालले असते तर आमचा पंतप्रधान शेतकरी असता. सर्व काही शेतकऱ्यांचेच असते, कारण इथला राजा शेतकरी आहे. बालपणी एक कविता शिकलो होतो - 'हे किसान, तू बादशाह है।' (२९ जानेवारी १९४८ ला हत्येच्या एका दिवसाआधी)
अाठ राज्यांमधून सहभाग
बीकेयू झेंड्याखाली हरिद्वारमधून २३ सप्टेंबरपासून किसान क्रांती यात्रा सुरू झाली. यामध्ये उत्तर प्रदेश, पंजाब, बिहार, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, ओडिशा, केरळचे शेतकरी सहभागी झाले.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या अशा...
- स्वामिनाथन अहवाल तत्काळ लागू करावा.
- शेतकऱ्यांना कर्जमाफी, उसाची थकबाकी द्यावी.
- शेतकरी आयोग तत्काळ स्थापन करण्यात यावा.
- सिंचनासाठी मोफत वीजपुरवठा करण्यात यावा.
- साठीतील शेतकऱ्यांना दरमहा ५ हजारांची पेन्शन.
- किसान क्रेडिट कार्डावर बिनव्याजी कर्जपुरवठा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a comment