0
 • farmers protested against BJP state president Danavneपैठण- मागील आठ वर्षांपासून रखडलेल्या २२२ कोटींच्या ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचा दुसरा टप्पा कधी सुरू होणार, असा सवाल करत शेतकऱ्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचे भाषणच बंद पाडले. दानवे यांनी शेतकऱ्यांचा संताप पाहता पाच मिनिटे शांत उभे राहणे पसंद करीत या योजनेसाठी एकाच वेळी ४१ कोटी रुपये देणार असल्याचे आश्वासन देत वेळ मारून नेली.
  Advertisement


  पैठण तालुक्यातील ५५ गावांतील पिण्याच्या पाण्यासह शेतीला पाणी मिळणार अाहे. याच कामाचा आढावा व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी रविवारी तालुक्यातील खेर्डा येथे शेतकऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. या बैठकीला खासदार रावसाहेब दानवे, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पाटबंधारेचे विभागीय अभियंता ई. डी. कोहिरकर, अनिल निंभोरे, कल्याण गायकवाड, तुषार शिसोदे, दत्ता गोर्डे, डॉ. सुनील शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

  ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेचा पहिला टप्पा दोन, तीन महिन्यांत पूर्ण होईल. शेतकऱ्यांनी कोणतीही अडचण आणू नये. ज्यांच्या जमिनींचा प्रश्न असेल त्यांनी अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन खा. रावसाहेब दानवे यांनी करताच हर्षी थेरगाव या भागातील तरुणांसह शेतकऱ्यांनी 'दानवे तुम्ही केवळ घोषणाच करता. मात्र आठ वर्षांत पहिला टप्पाही पूर्ण झाला नाही. दुसरा कधी होणार', असा सवाल केला. 'आधी काम करा नंतर बोला', अशी भूमिका घेत शेतकरी घोषणाबाजी करू लागले. तेव्हा दानवे यांनी माईक सोडून शेतकऱ्यांसमोर येत 'आता तुम्हीच बोला, मी थांबतो' असे म्हणत पाच मिनिटे शांत राहिले. तरीही शेतकऱ्यांनी विरोध सुरूच ठेवला. दानवे यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली. यात केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतकऱ्यांविषयी अनेक योजना आणल्या. मागील सरकारने शेतकऱ्यांना खत घेण्यासाठी रांगेत उभे केले होते. आताच्या सरकारने साडेचार वर्षांत एकाही शेतकऱ्यालाा खतासाठी रांगेत उभे केले नाही, असे सांगत असतानाच पुन्हा काही शेतकऱ्यांनी खत कमी येत असल्याची तक्रार करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यावर दानवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन कोणत्याही दुकानावर चला, त्या दुकानदाराला जेलमध्ये टाकू, अशी ग्वाही देत शेतकऱ्यांनी आमच्या बरोबर राहावे, असे आवाहन केले. आपल्या १६ मिनिटांच्या भाषणात दानवे यांना शेतकऱ्यांनी दोन वेळा भाषण करताना रोखले.

  ब्रह्मगव्हाणसाठी एकाच वेळी ४१ कोटी देणार : शेतकऱ्यांचा विरोध पाहता दानवे यांनी ब्रह्मगव्हाण योजनेचा पहिला टप्पा लवकर मार्गी लागावा व दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू करण्यासाठी जो पैसा लागेल, तो देणार आहोत. लवकरच योजनेसाठी एकाच वेळी ४१ कोटी रुपये देणार असे आश्वासन दानवे यांनी दिले.

  दुष्काळासाठी आंदोलन करू नका 
  राज्यातील शेतीला सध्या तरी पाणी आहे. विरोधक नाहक दुष्काळाची ओरड करत आहेत. ते तुम्हाला आंदोलन करायला लावतील. मात्र सरकार या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तुम्हाला आंदोलन करण्याची गरज नाही. दुष्काळ असेल तर तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाईल, असेही दानवे म्हणाले. दावाही दानवे यांनी केला
  .

Post a comment

 
Top