0
  • मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंप्रमाणेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही प्रखर हिंदुत्वाचा अंगीकार करणार असून दसरा मेळाव्यात हिंदुत्वाचा एल्गार करीत राम मंदिर बांधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर निकराचा हल्लाबोल करणार आहेत. दसरा मेळाव्यातील भाषणात उद्धव ठाकरे हिंदुत्वावरून भाजपवर निशाणा साधणार असल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली आहे.

    सूत्रांच्या मते, दसरा मेळावा शिवसैनिकांसाठी उत्सव असायचा. बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक येत. उद्धव ठाकरे यांनीही परंपरा सुरू ठेवली असली आणि गर्दी होत असली तरी त्यातून शिवसैनिकांना विशेष वैचारिक खाद्य काही मिळत नसे. मात्र, आता भाजपचे हिंदुत्व बेगडी असून शिवसेनाच प्रखर हिंदुत्ववादी असल्याचे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील जनतेला दाखवून देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणातून करणार आहेत. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपला घेरणार आहेत. भाषणासाठी काढलेल्या मुद्द्यांमध्ये हा मुद्दा प्राधान्याने घेण्यात आलेला आहे. मंदिर बांधण्यासाठी भाजपने आंदोलन केले, परंतु आता सत्तेवर आल्यानंतरही भाजप मंदिर बांधू शकलेला नाही, यावर भर देत मोदी यांच्यापेक्षा वाजपेयी यांचे हिंदुत्व प्रखर होते. भिवंडी येथील दंगलीनंतर वाजपेयी यांनी केलेल्या "हिंदू अब मार नहीं खाएगा' या त्यांच्या वक्तव्याचा उल्लेखही उद्धव करतील, अशी माहिती आहे.

    रफाल, जीएसटी, नोटबंदीवरूनही घेरणार हिंदुत्वासोबतच न्यायालयात घेण्यात आलेले समलिंगी विवाहासारखे विविध निर्णय, नोटाबंदी, रफाल प्रकरण, जीएसटी, काश्मीरमध्ये होणारे हल्ले आदी मुद्द्यांवरही उद्धव ठाकरे भाजपवर निशाणा साधणार असून राज्य सरकारवर टीका
    करीत दुष्काळ, शेतकरी आत्महत्या आणि कर्जमाफी योजनेच्या अयशस्वितेवरही टीका करणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

    निवडणुकीपूर्वीचा शेवटचा दसरा : पुढील वर्षीच्या दसरा मेळाव्यापूर्वी लोकसभा-विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने निवडणुकीपूर्वीचा हा शेवटचा दसरा मेळावा आहे. शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय केला असून लोकसभेसाठी हिंदुत्वाचा मुद्दाच लाभदायी ठरेल आणि भाजपला धोबीपछाड देता येईल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांना वाटत आहे.

    खासदार संजय राऊत यांनी केली अयोध्येत पाहणी 
    भाजपपेक्षा शिवसेना प्रखर हिंदुत्ववादी असून जेव्हा-जेव्हा हिंदूंवर अत्याचार झाले तेव्हा शिवसेनाच पुढे आली. राम मंदिराचा निर्णय न्यायालयात होणार आहे. सगळेच निर्णय न्यायालय घेणार असेल तर आमचे काय, असा प्रश्नही उद्धव ठाकरे उपस्थित करणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. उद्धव ठाकरे मेळाव्यातच अयोध्येला जाण्याची तारीख जाहीर करणार आहेत. त्याच्या तयारीसाठी खासदार संजय राऊत नुकतेच अयोध्येला जाऊन पाहणी करून आले आहेत.
    News about Shivsena dasara melava

Post a Comment

 
Top