0
महाराष्ट्रा एक्सप्रेस               

नाशिक- नाशिकमध्ये रविवारी सुमारे 100 लोकांनी जिवंत असलेल्या पत्नींचे पिंडदान केले. हा प्रकार अत्यंत संतापजनक, स्टंटबाज आणि महिलांचा अपमान करणारा आहे, असे सांगत भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी संबंधितांविरोधात कारवाई करण्याची मागणी नाशिक जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

घटस्फोट न देता अडवणूक करणाऱ्या पत्नींमुळे त्रस्त पुरुषांसाठी कार्यरत वास्तव या संस्थेच्या वतीने हे पिंडदान करण्यात आले होते. मात्र आयोजकांच्या स्टंटबाजीला बळी न पडता, पत्नीपीडित पुरुषांनी लोकशाही मार्गाने त्यांच्या मागण्या शासनाकडे मांडाव्यात, असे अावाहन देसाई यांनी केले आहे. अन्यथा, आमच्या पद्धतीने उत्तर देण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
'पत्नीपीडित पुरुषांच्या समस्या आणि मागण्या असू शकतात, परंतु त्यासाठी न्यायव्यवस्था आहे, कायद्यात बदल हवा असल्यास सरकार आहे, या लोकशाही मार्गांनी न जाता, वटपौर्णिमेला उलट्या फेऱ्या मारणे, जिवंतपणी पिंडदान करणे यासारख्या स्टंटबाज कार्यक्रमातून हे आयोजक पुरुषांची दिशाभूल आणि महिलांचा अपमान करीत आहेत. अशा स्टंटबाजीतून प्रश्न सुटत नसतात. पत्नीपीडित पुरुषांच्या काही मागण्या असतील, त्यांना कायद्यात बदल हवा असेल तर कायदेशीर मार्गाने न्याय मिळवण्याचा मार्ग त्यांना खुला आहे. परंतु अशा प्रकारे जिवंत पत्नींचे पिंडदान करण्याचा प्रकार अत्यंत संतापजनक, स्टंटबाज आणि निव्वळ महिलांचा अपमान करणारा आहे. किंबहुना, यापुढे हे प्रकार बंद व्हावेत आणि असे काही करण्याचे आयोजकांचे धाडस होऊ नये यासाठी नाशिक पोलिस अधीक्षकांनी संबंधित पुरुष, आयोजक संस्था व पुजारी यांच्याविरोधात कारवाई करावी,’ अशी मागणी देसाई यांनी केली.
हे तर धर्मशास्त्राच्याही विरोधात 
जिवंत व्यक्तीचे श्राद्ध करणे हा अत्यंत दुर्मिळ आणि कडक निकष असलेला दुर्मिळ विधी आहे. हा विधी करणाऱ्यांना स्वत:च्या घरात राहता येत नाही, संसाराचा परित्याग करून संन्यास घ्यावा लागतो. मात्र पत्नीपीडित पुरुषांकडून हा विधी करवून घेणे हा धर्मशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत चुकीचा प्रकार आहे. स्टंटबाजीसाठी अशा प्रकारे धर्मशास्त्राचा गैरवापर करणे कदापि क्षम्य नाही. पुरोहित संघाने याची योग्य ती दखल घेतली असून असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. 
- सतीश शुक्ल, अध्यक्ष, पुरोहित संघ, नाशिक
trupti desai News in Marathi

Post a Comment

 
Top