नवी दिल्ली - सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना सुटीवर पाठवण्याच्या मोदी सरकारच्या आदेशाच्या विरोधात काँग्रेसने देशभरात आज आंदोलन पुकारले आहे. सीबीआयमधील वादानंतर आलोक वर्मा आणि स्पेशल डायरेक्टर राकेश अस्थाना यांच्यातील वाद सर्वांच्या समोर आला. त्यानंतर केंद्र सरकारने दोघांना सुटीवर पाठवले. त्याविरोधात शुक्रवारी दिल्लीमध्ये सीबीआय मुख्यालय आणि राज्यांच्या सीबीआय कार्यालयांसमोर काँग्रेसच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले आहे.
नवी दिल्लीत राहुल गांधींच्या नेतृत्त्वात आंदोलन
नवी दिल्ली येथील सीबीआयच्या मुख्यालयाबाहेर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आंदोलन पुकारण्यात आले आहे. आलोक वर्मा यांना सुटीवर पाठवण्याचा आदेश मागे घ्यावा आणि पंतप्रधान मोदींनी या प्रकरणी संपूर्ण देशाची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे. राफेल प्रकरण दाबण्यासाठी केंद्र सरकारकडून वर्मा यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी आणि काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

Post a Comment