0
नाशिक- जायकवाडी (जि.औरंगाबाद) येथील नाथसागरात पाणी सोडण्याच्या विरोधात बुधवारी रामकुंडावर सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी थेट रामकुंडात उतरून भाजप सरकारचा निषेध केला. एवढेच नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्‍यात आली. यासंदर्भात आंदोलकांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रात सर्वाधिक धरणांचा जिल्हा म्हणून सन्मानित होणारा नाशिक जिल्हा पाणीदार नेतृत्त्वाच्या अभावामुळे काठोकाठ भरलेली धरणे उशाशी घेऊन तहानेने व्याकूळ होत उपाशीपोटी झोपत आला आहे. धरणांचा जिल्हा म्हणून नावलौकीक मिळविण्यासाठी या जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी स्वतःच्या प्रपंचावर तीळ वाहून आपल्या जमिनी धरणांसाठी पाटनाल्यांसाठी दिल्या आहेत. स्वसंसाराचा त्याग करून धरणाखालील मराठवाड्यासारख्या आपल्याच समाजबांधवांची तहान भागावी म्हणून प्रसंगी स्वतः तहानेने व्याकूळ राहून त्यांची तहान भागविण्याचा शेजारधर्म पाळला आहे.
तथापी आज परिस्थिती वेगळी आहे. सध्या नाशिक जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाच्या झळांनी होरपळून निघत असताना, आगामी दोन महिन्यात नाशिक जिल्ह्यातील जनतेला पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची शक्यता निर्माण झाली असताना प्रशासन महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम 2005 आणि तत्सम अधिनियम, अध्यादेशांचा आधार घेऊन नाशिककरांचे हक्काचे पाणी मराठवाड्याला मिळावे, म्हणून आदेश जारी करीत आहे.
मराठवाड्यातील जनतेला पिण्यासाठी पाणी देण्यास आमचा विरोध अजिबात नाही. मात्र धरणांचा मालक असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांसह सामान्य जनतेला तहानेने व्याकूळ करून मराठवाडा काही प्रमाणात अहमदनगर जिल्ह्यातील धनदांडगे शेतकर्‍यांचे मळे, दारूचे कारखाने आणि अन्य उद्योग यांसाठी पाणी देण्याचे षडयंत्र छावा क्रांतीवीर सेना कदापी यशस्वी होऊ देणार नाही.
मराठवाड्याला पिण्यासाठी पाणी द्यायचेच असेल तर त्यांच्या गरजेप्रमाणे थेट पाईप लाईनसारखी योजना निर्माण करावी त्यासाठी आम्ही नाशिककर प्रशासनाच्या पाठीशी उभे राहू, मात्र पिण्याच्या नावावर धनदांडग्यांचे मळे आणि उद्योगधंदे फुलविण्यासाठी हा संभाव्य विसर्ग आम्ही होऊ देणार नाही.
नदीपात्रातून पाणी जायकवाडी धरणात जाईपर्यंत निम्याहून अधिक पाणी वाया जाते, त्याचा विचार करून प्रशासनाने थेट लाभार्थ्यांनी पूर्ण लाभ होण्याच्या दृष्टीने थेट पाईपलाईन टाकावी, आणि फेरसर्व्हेक्षण झाल्यानंतर पाण्याचा विसर्ग करावा. तोपर्यंत गंगापूर, गोदावरी दारणा, पालखेड या तीन धरणसमुहातील गंगापूर, कश्यपी, गौतमी गोदावरी !आळंदी, कडवा, भाम, भावली, वाकी, दारणा, मुकणे, वालदेवी, करंजवण, वाघाड, पुणेगाव, ओझरखेड, पालखेड तीसगाव या धरणांमधून विसर्ग रोखावा. अन्यथा जिल्ह्यातील शेतकरी आणि सामान्य जनतेच्या पाण्याच्या न्याय हक्कासाठी छावा क्रांतीवीर सेना अभूतपुर्व संघर्ष छेडेल. त्यातून उद्भवणार्यांना परिणामांची जबाबदारी सर्वतोपरी शासन प्रशासनावर राहील, याची नोंद घ्यावी.
असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी निवेदन देतांना छावा क्रांतिवीर सेना संस्थापक अध्यक्ष करण गायकर, उमेश शिंदे, शिवा तेलंग, शिवाजी मोरे, अरुण पाटिल, संतोष माळोदे, नितिन सातपुते, ज्ञानेश्वर थोरात, किरण बोरसे, विजय खर्जूल, पूजा धुमाळ, सागर पवार, शिवम देशमुख,सोमनाथ पवार, मयुरी पिंगळे, सुजाता जगताप, छाया नाडे, किरण वाघ, मनोरमा पाटील, ज्ञानेश्वर शेलार आदी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top