मुंबई- अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकरांवर केलेल्या आरोपांची राज्य महिला आयोगानेही दखल घेतली आहे. तनुश्रीने सोमवारी तक्रार दाखल केल्यानंतर आयोगाने अभिनेते नाना पाटेकर, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, निर्माता समीर सिद्दिकी आणि राकेश सारंग यांना नोटीस बजावली आहे.
'हॉर्न ओके प्लीज' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान पाटेकर यांनी आपल्याशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप तनुश्रीने केल्यानंतर एकच खळबळ माजली. या प्रकरणी रोज नवे खुलासे होत असून वेगवान घडामोडी घडत आहेत. पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर तनुश्रीने सोमवारी वकील अॅड. नितीन सातपुते यांच्यामार्फत या प्रकरणाची लेखी तक्रार राज्य महिला आयोगाकडेही केली होती. आयोगाने तातडीने कारवाई करत नाना पाटेकरांसह तिघांना नोटीस बजावली. येत्या दहा दिवसांत आयोगासमोर प्रत्यक्ष हजर राहून किंवा लेखी खुलासा करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. तनुश्रीने वकिलामार्फत तक्रार केल्याने याबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी तिने स्वत:ही उपस्थित राहण्याचे निर्देश दिल्याचे आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले.
पोलिसांकडूनही मागवली कारवाईची माहिती
मुंबई पोलिसांकडेही या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे तनुश्रीने आयोगाला सांगितले आहे. त्यामुळे याप्रकरणी आतापर्यंत काय कारवाई केली, अशी विचारणा आयोगाने मुंबई पोलिसांकडेही केली आहे. पोलिसांनी त्याबाबतचा अहवाल १० दिवसांत सादर करावयाचा आहे.
Post a Comment