0
कोलंबो- श्रीलंकेतील राजकीय संकटात माजी पेट्रोलियममंत्री व माजी क्रिकेटपटू अर्जुन रणतुंगा यांना सोमवारी अटक करण्यात आली. रविवारी रणतुंगा यांना महिंदा राजपक्षे यांच्या समर्थकांकडून ओलीस ठेवण्याचा प्रयत्न होत असताना त्यांच्या अंगरक्षकाने गोळीबार केला होता. यात एक नागरिक ठार, तर दोघे जखमी झाले. यानंतर ही कारवाई करण्यात आली. पेट्रोलियम मंत्रालय परिसरात रणतुंगा यांच्या सुरक्षा रक्षकाने केलेल्या गोळीबारामुळे एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस प्रवक्ते रुवान गुनसेकरा यांनी सांगितले. पदच्युत पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या सरकारमध्ये रणतुंगा यांच्याकडे पेट्रोलियम मंत्रालय होते. रणतुंगा रविवारी सीलोन पेट्रोलियम कॉर्पाेरेशन (सीपीसी) परिसरात भेट देण्यासाठी गेले असता राजपक्षे समर्थकांनी त्यांच्या येण्यावर आक्षेप घेतला. रणतुंगा यांनी इमारतीत प्रवेश केल्यानंतर राजपक्षे समर्थकांनी त्यांना बाहेर पडू देण्यास मज्जाव केला. यादरम्यान त्यांच्या अंगरक्षकाने गोळीबार केला होता. रणतुंगा विक्रमसिंघे यांचे समर्थक आहे. राष्ट्राध्यक्ष सिरिसेना यांनी विक्रमसिंघे यांना नुकतेच पदच्युत केले आहे. विक्रमसिंघे यांनी ही कारवाई घटनाबाह्य असल्याचे म्हटले आहे. सिरिसेना यांनी 16 नोव्हेंबरपर्यंत संसद निलंबित ठेवली आहे. विक्रमसिंघे यांना पदच्युत केल्यानंतर मंत्रिमंडळ विसर्जित झाल्याचे राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने स्पष्ट केले आहे. राजपक्षे यांनी पदभार स्वीकारला महिंदा राजपक्षे यांनी सोमवारी श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारला. राजपक्षे पंतप्रधान सचिवालयातून कामकाज पाहतील, असे श्रीलंका पीपल्स पार्टीच्या सूत्रांनी सांगितले. मावळते पंतप्रधान विक्रमसिंघे पंतप्रधान सचिवालयातून कामकाज पाहत नव्हते. सुरुवातीस निवडक नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पहिल्या टप्प्यात अर्थ, कायदा व सुव्यवस्था, परराष्ट्र व गृहमंत्र्यांना शपथ दिली जाईल. राजपक्षे यांचा 2015 च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत सिरिसेना यांनी पराभव केला होता.

Post a Comment

 
Top