अंबड- पावसाच्या दडीमुळे शेतात उरलीसुरली पिके वाचवण्याचा प्रयत्न करीत राबणारे कुटुंब रात्री घरात उकाडा होत असल्याने गच्चीवर झोपले. हीच संधी साधून चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोडून कपाटातील सोन्याचे नेकलेस, गंठण, एक झुंबर जोड, दोन पोती, एक सोन्याचे ओम व नगदी १५ हजार रुपये असा एकूण १ लाख ५३ हजार ९०० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना अंबड तालुक्यातील पांगारखेडा येथे ८ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री घडली.
पांगारखेडा येथील कृष्णा भगवान कोल्हे (३१) हे ८ ऑक्टोबर रोजी शेतातून काम करून घरी परतले. जेवणानंतर घरात उकाडा जाणवत असल्याने सर्व कुटुंबच रात्री ९ वाजेच्या सुमारास गच्चीवर झोपण्यास गेले. दरम्यान, सोमवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास शकुंतलाबाई कोल्हे गच्चीवरून खाली आल्या असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आत जाऊन बघितले तर दोन कपाटे उघडे दिसली. घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पती कृष्णा कोल्हे यांना झोपेतून उठवले. त्यानंतर दोघा पती पत्नीने घराची पाहणी केली असता, कपाटातील १५ हजार रुपये, ६३ हजार रुपये किमतीचे तीन तोळे सोन्याचे गंठण, ३७ हजार ८०० रुपये किमतीचे एक नेकलेस, १४ हजार रुपये किमतीचे झुंबर, २१ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन कांडी पोत, २ हजार १०० रुपयांचा १ ग्रॅमचा ओम असा एकूण १ लाख ५३ हजार ९०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी कृष्णा भगवान कोल्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास तपास सहायक पोलिस निरीक्षक एल. डी. सोन्ने हे करीत आहेत.
चोऱ्यांचे सत्र सुरूच
अंबड व घनसावंगी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. गोंदी परिसरातही चोरट्यांनी धारदार शस्त्राने हल्ला करून कुटुबीयांना जखमी करून लूट केल्याच्या घटनेतील आरोपी अजूनही फरार आहेत. तसेच किरकोळ चोऱ्यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
Post a Comment