0
मुंबई - मुंबई-गोवा क्रुझवरील अमृता फडणवीस यांचा सेल्फी घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत होता. यानंतर चहुबाजूने अमृता फडणवीसांवर टिका केली जात होती. आता त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्या म्हणाल्या की, मी एका क्रूझवर होते. मी ज्या जागी बसली होती ती जागा सुरक्षित होती. मी सेल्फी काढायला गेले नव्हते. मी बऱ्याच दिवसांनी शुद्ध हवेचा अनुभव घेत होते, असे त्यांनी म्हटले आहे.

उपस्थित अधिकारी मला उद्घाटन सोहळ्याला येण्याची विनंती करत होते. मात्र, मी शुद्ध हवेचा अनुभव घेण्यासाठी तिथेच थांबले, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसने अमृता फडणवीस यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. यावरही अमृता यांनी भाष्य केले. जर यामुळे एका व्यक्तीचंही भले होत असेल तर माझ्यावर कारवाई व्हावी. मी कोणासमोरही यासाठी माफी मागू शकते. सेल्फी घेऊन स्वत:चा जीव धोक्यात घालू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
असे होते प्रकरण 
मुंबई-गोवा क्रूझ पर्यटन सेवा 20 ऑक्टोबर सुरू करण्यात आली आहे. आंग्रिया असे नाव असलेली ही क्रूझ भाऊचा धक्का येथून गोव्याच्या दिशेने रवाना करण्यात आली. या क्रूझला केंद्रीय बंदरे विकास मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झेंडा दाखवला. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी सपत्निक हजेरी लावली होती. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नव्हता.त्यांनी सेल्फी काढण्यासाठी चक्क क्रूझचे टोक गाठले आणि अगदी टोकावर बसून सेल्फी घेतला. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. व्हिडिओमध्ये एक महिला पोलिस अधिकारी त्यांच्या गार्डला काही बोलताना दिसून येत होत्या. तसेच अमृता फडणवीस पुढच्या काही सेकंदांतच आपल्या मोबाईलमध्ये सेल्फी घेताना दिसतात. पण, अमृता फडणवीस यांनी सुरक्षा मोडून हा सेल्फी स्टंट का केला असा सवाल उपस्थित केला जात होता. आता अमृता फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
Wife of CM amruta fadnavis selfie stunt video on cruise goes viral

Post a Comment

 
Top