0
औरंगाबाद- आगामी निवडणुकीसाठी एमआयएम-भारिप बहुजन महासंघाने एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘वंचित बहुजन आघाडी’ची पहिली जाहीर सभा मंगळवारी औरंगाबादेत झाली. त्यात एमआयएमचे अध्यक्ष बॅ. असदुद्दीन ओवेसी आणि महासंघाचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. महात्मा गांधी नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरच भारताचे सर्वात मोठे नेते आहेत, असे ओवेसी म्हणाले. तर मोदी इतके स्वच्छ आहेत की ते स्वत: खात नाहीत, पण इतरांना खाऊ देतात आणि त्यांच्याकडील निम्मे स्वत:साठी मागून घेतात, अशी टीका आंबेडकरांनी केली.


बीड बायपास भागात जबिंदा लॉन्सवर झालेल्या या सभेस प्रचंड गर्दी होती. दुपारी १२ वाजताची नियोजित वेळ असली तरी आंबेडकर, ओवेसींची भाषणे चार वाजता सुरू झाली. ओवेसी म्हणाले, आज गांधी जयंती आहे. भारताच्या इतिहासात महात्मा गांधी नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच मोठे नेते होते. त्यांनी सर्व जाती-पातींचा विचार केला. मुस्लिमांना मतांचा अधिकार देता येणार नाही, असे जेव्हा घटना समितीच्या बैठकीत सांगण्यात आले तेव्हा डॉ. आंबेडकरांनी त्यास कडाडून विरोध केला. त्यामुळे भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे नेते म्हणजे आंबेडकरच, असे त्यांनी स्पष्ट केले.

मोदींचा शोध नोबेलसाठी पात्र, गोरक्षक ते गॅसपर्यंत सारेच वेगळेपण
मोदींवर कठोर हल्ला करत ओवेसी म्हणाले की, तरुण जेव्हा नोकऱ्यांची मागणी करतात तेव्हा मोदी त्यांना गोरक्षक बनण्याचा सल्ला देतात. मोदींच्या काळात शेतकरी, गरीब बरबाद झाले आहेत. वरून मोदी पुन्हा नाल्यातील गॅसवर चहा बनवण्याचा सल्ला देतात. मोदींचा हा शोध नोबेलसाठी पात्र आहे. त्यांनी नामांकन केले असते तर आज नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या यादीत त्यांचे नाव असते. इंधन दरवाढीने लोक हैराण आहेत.

काँग्रेसचा डीएनए ब्राह्मणांचा
ओवेसींनी काँग्रेसलाही घेरले. ते म्हणाले की, मोदींना राहुलच पर्याय असे चित्र निर्माण केले जाते. काँग्रेसचा डीएनए ब्राह्मणांचा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे बहुजनांनी एकत्र येऊन पर्याय निर्माण करावा.

भारतीयांना देशोधडीला लावणे हीच मोदींची देशभक्ती : अॅड. आंबेडकर
अॅड. प्रकाश आंबेडकर २५ मिनिटांच्या भाषणात नरेंद्र मोदींवर कठोर शब्दांत टीका केली. ते म्हणाले की, कच्च्या तेलाचे जागतिक बाजारात काय भाव आहेत, हे मोदी काहीच सांगणार नाहीत. कारण सारख्या भावाने इंधन खरेदी करून अन्य देशांमध्ये भारतापेक्षा कमी किमतीत पेट्रोल कसे काय मिळते, असा सवाल जनता करेल, त्यामुळे ते भाव मोदी सांगणार नाहीत. देशभक्तीची व्याख्याच मोदींनी बदलून टाकली आहे. देशोधडीला लावणे हीच मोदींची देशभक्ती असल्याचे ते म्हणाले.
हा तर देशात आणीबाणी जाहीर करण्याचा प्रयत्न
पुढे आरएसएस व भाजप सरकारकडून देशात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न होईल. ते यशस्वी झाले तर आणीबाणी लादून निवडणुकाही पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे जनतेने जागरूक राहून हे प्रयत्न हाणून पाडावेत, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. देशात पोलिस, लष्कर, गुप्तचर यंत्रणा असताना संघाच्या माणसांकडे एके ४७ सारखी शस्त्रे कशासाठी सापडतात, असा सवाल त्यांनी केला. देशात नक्षलींवर कारवाई होते, परंतु सनातनसारख्या संघटना व कार्यकर्त्यांवर कारवाई का हाेत नाही, असा सवाल त्यांनी या वेळी केला.
'एमआयएम'ची ताकद भारिपच्या पथ्यावर?
औरंगाबादेत या आघाडीचा सर्वाधिक फायदा अॅड. आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघालाच होईल, 'एमआयएम'ची ताकद त्यांच्या पथ्यावर पडू शकते. मात्र एमआयएमने भारिप बहुजन महासंघाऐवजी मायावतींच्या बसपला सोबत घेतले असते तर कदाचित ही आघाडी अधिक प्रभावी ठरली असती, अशी चर्चा रिपब्लिकन जनतेत आहे.

औरंगाबाद महापालिकेत 115 पैकी एमआयएमचे 24 नगरसेवक आहेत. 15 जागी लढणाऱ्या भारिप बहुजन महासंघाला एकही जागा मिळवता आलेली नाही.या उलट बसपाचे 7 संख्याबळ आहे. भारिपने औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातही उमेदवार उतरवला होता, मात्र तिथे त्यांचा उमेदवार चर्चेतही येऊ शकला नाही. याउलट बसपाने औरंगाबादेतील तिन्ही विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिली होती. पश्चिममध्ये बसपाचे उमेदवार संजय जगताप यांनी 22 हजार मते मिळवली होती, तर पूर्व व मध्य मतदारसंघात या पक्षाने 10 हजारांपर्यंत मते मिळवली होती. लोकसभा निवडणुकीतही बसपाने 57 हजारांवर मते घेतली होती. बसपाच्या या ताकदीचा आगामी निवडणुकांत एमआयएमला निश्चितच फायदा होऊ शकला असता. दुसरीकडे, भारिपकडे हक्काच्या मतदारांचा अभाव आहे. सध्याच्या एमआयएम-भारिप आघाडीचा काँग्रेस व राष्ट्रवादीला किती फटका बसणार याचीच चर्चा आहे. कारण संभाव्य तिरंगी-चौरंगी लढतीत जे मतदार कदाचित काँग्रेस-राष्ट्रवादीकडे गेले असते ते आता या आघाडीचा विचार करू शकतील. गेल्या विधानसभा निवडणुकीत पूर्व मतदारसंघातून एमआयएमचे डॉ. गफार कादरी हे केवळ साडेचार हजार मतांनी पराभूत झाले. त्या वेळी एमआयएमसोबत इतर पक्ष असते तर पश्चिम व पूर्व मतदारसंघही ताब्यात घेता आला असता, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
सर्व रिपब्लिकन पक्षातील गटा-तटांना सोबत घेतले असते तर...
केवळ भारिपला सोबत न घेता एमआयएमने सर्वच रिपब्लिकन गटा-तटांना सोबत घेतले असते तर कदाचित औरंगाबादेतील तिन्ही मतदारसंघांत त्यांना यश मिळवता आले असते. शहरात मुस्लिम मतदारांची संख्या 35 टक्क्यांपर्यंत, तर दलित मतदारांची संख्या 15 टक्क्यांच्या पुढे आहे. तसेच 30 टक्के ओबीसीतील 10 टक्के मतदान जरी या आघाडीकडे वळले असते तर संपूर्ण शहराचे सत्ताकारण त्यांच्या ताब्यात जाऊ शकले असते.
राजकारणाला कलाटणी
औरंगाबादेत होणारी सभा राज्यातील राजकारणाला कलाटणी देणारी ठरेल. कोणी काहीही म्हणत असले तरी ही आघाडी राजकीय चित्र बदलणार आहे. वंचित समाजाच्या काही नेत्यांना पुढे करून निवडणुका लढल्या जातात. सत्ता आल्यावर या नेत्यांनाही नाकारले जाते, ही स्थिती आता बदलेल.
- अॅड. प्रकाश आंबेडकर, भारिप बहुजन महासंघ
औरंगाबादेतील जातीय समीकरण
मुस्लिम मतदार : 35 टक्क्यांपर्यंत
दलित मतदार : 15 टक्क्यांच्या पुढे

ओबीसी मतदार: 30 टक्क्यांपर्यंत
(स्रोत- स्थानिक राजकारणी व राजकीय अभ्यासक)
News about Bahujan Mahasangh and MIM Rally in Aurangabad

Post a comment

 
Top