0
  • जळगाव- सहकारी गृहनिर्माण संस्था रद्द होऊ नये म्हणून अनुकूल खुलासा देण्यासाठी १ लाख ७५ हजार रुपयांची लाच घेताना सहायक उपनिबंधकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. मंगळवारी सायंकाळी ५ वाजता काव्यरत्नावली चौकातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून ही कारवाई केली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


    मधुसुदन हरनिवास लाठी (वय ५२, रा. अमळनेर) असे अटक केलेल्या उपनिबंधकाचे नाव आहे. त्याच्याकडे जळगावच्या सहायक उपनिबंधकाचा पदभार होता. जळगाव शहरात राहणाऱ्या एका तक्रारदाराची गृहनिर्माण सोसायटी आहे. ही सोसायटी रद्द होण्याची प्रक्रिया सुरू होती. सोसायटी रद्द होऊ नये, यासाठी लाठी यांचा खुलासा आवश्यक होता. लाठी याने अनुकूल खुलासा देण्यासाठी ६ ऑक्टोबर रोजी तक्रारदाराकडे १ लाख ७५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार मंगळवारी पैसे देण्याचे ठरले होते. तत्पूर्वी तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागात तक्रार केली. त्यानुसार विभागाचे उपअधीक्षक गोपाल ठाकूर, पोलिस निरीक्षक नीलेश लोधी, मनोज जोशी, शामकांत पाटील, प्रशांत ठाकूर, नासिर देशमुख, महेश सोमवंशी यांच्या पथकाने सापळा रचून लाठी याला रंगेहाथ अटक केली. त्याच्याविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    तक्रारदाराने डोक्यावरुन हात फिरवताच पकडले 
    लाठी याने लाच घेण्यासाठी काव्यरत्नावली चौकातील एका हॉटेलची निवड केली होती. ठरल्याप्रमाणे तक्रारदार तेथे पोहोचले. लाठी याला लाचेची रक्कम दिल्यानंतर तक्रारदाराने बाहेर येताना स्वत:च्या डोक्यावरुन हात फिरवण्याचा 'कोडवर्ड' ठरला होता. लाठीने लाच स्वीकारली व तक्रारदाराने हॉटेलमधून बाहेर पडताना उजवा हात डोक्यावरुन फिरवला. संकेत मिळताच दबा धरुन बसलेल्या पथकाने हॉटेलच्या बाहेर येऊन लाचखोर लाठी याच्या मुसक्या आवळल्या.
    Jalgaon's Assistant Deputy Registrar areested while taking bribe

Post a Comment

 
Top