नागपूर- लष्करी जवानांच्या मार्चपासला बँड पथकाकडून वाजवली जाणारी मार्शल धून आता नागपूरच्या संगीतकार डॉ. तनुजा नाफडे यांची असेल. 'शंखनाद' ही भारतीय व पाश्चात्त्य संगीताचा मिलाफ साधणारी धून भारतीय लष्कराची मार्शल धून म्हणून निश्चित झाली आहे. लष्करासाठी अशी मार्शल धून रचण्याचा सन्मान मिळालेल्या त्या पहिल्या नागरिक ठरल्या आहेत.
रविवारी दिल्लीत या शंखनाद धूनचे लोकार्पण लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्या हस्ते करण्यात आला. आजवर वाजवल्या जाणाऱ्या लष्कराच्या मार्शल धून ब्रिटिश काळातच रचलेल्या आहेत. त्या पाश्चात्त्य संगीतावर आधारित होत्या. वर्षानुवर्षे त्यात बदल झाले नव्हते. मात्र, प्रथमच भारतीय संगीत आणि पाश्चात्त्य संगीताचा मिलाफ साधून ही धून रचण्यात आली. त्याला लष्कराने आपली मार्शल धून म्हणून मान्यताही दिली आहे.
अशी झाली धूनची निर्मिती
लष्करासाठी मार्शल धून रचण्याचा अनुभव सांगताना डॉ. नाफडे यांनी हे काम अतिशय आव्हानात्मक असल्याचे सांगितले. २०१६ मध्ये लष्कराच्या महार रेजिमेंटचा अमृत महोत्सव होता. यानिमित्ताने गीत आणि त्यावर आधारित धून तयार करण्याचा विचार पुढे आला. ब्रिगेडियर विवेक सोहेल यांनी "देश को आच ना आने दे,' हे गीत रचल्यावर ते सुरुवातीला स्वरबद्ध करण्यात आले. त्याचे सादरीकरणही झाले. मात्र, हे गीत प्रभावी नसल्याने अधिकाऱ्यांनी डॉ. नाफडे यांना विनंती केली. दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांनतर डॉ. नाफडे यांनी ही धून तयार केली आहे.
Post a Comment