पुणे- भीमा नदीवरील उजनी धरणाच्या विस्तीर्ण जलाशयात मोठ्या प्रमाणात मासे आढळतात. त्यामुळे इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील सर्वांत मोठी मत्स्य बाजारपेठ मानली जाते. या पार्श्वभूमीवर उजनी जलाशयात मंगळवारी आजवरचा सर्वात मोठा मासा आढळला. कटला जातीच्या या माशाचे वजन तब्बल ४२ किलो होते. हा मासा भिगवण येथील उपबाजारात विक्रीसाठी येताच १३० रुपये किलो या दराने साडेपाच हजार रुपयांत या विक्रमी वजनाच्या माशाची विक्री झाली.
मंगळवारी उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात नितीन काळे, सुदाम चव्हाण आणि अक्षय चव्हाण यांनी मच्छीमारीसाठी जाळे टाकले होते. त्यांच्या जाळ्यात कटला जातीचा हा महाकाय मासा अडकला. त्याचे अवाढव्य रूप, वजन पाहून काही क्षणांतच या माशाची माहिती परिसरात पसरली. भिगवण येथील बाजारात हा मासा विक्रीसाठी येताच शंकर मोरे या खरेदीदाराने हा मासा विकत घेतला. माशाची माहिती मिळताच इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, जीवन फडतरे माशाची पाहणी केली.
Post a Comment