0
वर्धा- 'देशात महात्मा गांधी यांच्या विचाराचे नव्हे तर गोडसेच्या विचाराचेे सरकार सत्तेवर असून या सरकारचे धोरण द्वेषाचे आणि हिंसाचाराचे आहे. त्यामुळे यापूर्वी गांधी विचाराच्या आधारे देशाने ज्याप्रमाणे ब्रिटिशांच्या जोखडातून देश मुक्त केला, त्याचप्रमाणे आता नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध स्वातंत्र्याचा दुसरा लढा दिला जाईल,' असे आवाहन काँग्रेसच्या कार्यसमितीने मंगळवारी सेवाग्रामच्या गांधीभूमीतून कार्यकर्त्यांना आणि जनतेला केले आहे.


वर्धा येथील सेवाग्रामच्या महादेव भवनात मंगळवारी पार पडलेल्या कार्यसमिती बैठकीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, देशाचे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह कार्यकारी समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. याच महादेव भवनाच्या जागेतून महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांना 'चले जाव'चा इशारा दिला होता. त्याचप्रमाणे अाता गोडसेची विचारधारा बाळगणाऱ्या, देशात जाती-धर्मांमध्ये द्वेषभावना पसरवणाऱ्या शक्तींना या देशातून हद्दपार करण्याचा संकल्प आम्ही केला आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकारांना दिली. कार्यसमितीच्या या बैठकीत काँग्रेसने दोन प्रस्ताव पारित केले असून त्यात देशात द्वेषाचे वातावरण, विभाजनवाद, भय, ध्रुवीकरणाचे प्रयत्न करणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याच्या संकल्पाचा समावेश आहे. 
काॅंग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचे स्वागत केले.

दिल्लीतील शेतकऱ्यांवरील लाठीमाराचा निषेध 
गोडसेच्या विचारधारेवर चालणारे मोदी सरकार देशातील बहुतावादाविरोधात असून ते सुडाचे राजकारण करत आहे. खोट्यानाट्या गोष्टींचा प्रसार करत आहे. गांधी विचाराचा पुरस्कार हे त्यांचे ढोंग व संधिसाधूपणा अाहे. भाजप व संघ परिवाराने सातत्याने गांधी विचारधारेविरोधात कारस्थानच केले आहे. गांधींची हत्या करणारी गोडसे विचारधारा कदापिही गांधी विचारांचे चिंतन करू शकत नाही. गांधी विचारधारेवरील आक्रमण व अतिक्रमणाविरोधातही आमचा लढा असल्याचे काँग्रेसने ठरावात नमूद केले आहे.

मोदी सरकारच्या हुकूमशाही धोरणाचा निषेध करताना आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांच्या अधिकारांचे संवर्धन करणार, असा संकल्पही काँग्रेसने जाहीर केला. या बैठकीत बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी, सत्तेच्या मस्तीत मदमस्त असलेल्या मोदी सरकारला झुकवण्याचे आवाहन काँग्रेस कार्यकर्त्यांना केले. त्याचप्रमाणे आगामी काळात मोदी सरकारविरोधात संघर्षाची रूपरेषाही आपल्या कार्यकर्त्यांसाठी जाहीर केली.

माजी पंतप्रधान स्व. लालबहादूर शास्त्री यांच्या जय जवान, जय किसान या घोषणेचा उल्लेख करीत काँग्रेस कार्यसमितीने देशातील शेतकऱ्यांशी अत्यंत निर्दयतेने वागणाऱ्या मोदी सरकारच्या धोरणाचा ठरावातून तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या पीकमालाला योग्य दर देण्याचे आश्वासन पाळलेले नाही. या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी राजधानी दिल्लीमध्ये दाखल झालेल्या शेतकऱ्यांवरील अमानुष लाठीहल्ल्याचा काँग्रेस निषेध करीत असल्याचे कार्यसमितीने नमूद केले आहे.
राहुल, सोनिया गांधी यांना वऱ्हाडी भोजन; परंपरेप्रमाणे स्वतःच धुतले जेवणाचे ताट 
वर्धा- काँग्रेस कार्यकारिणीची बैठक महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त सेवाग्राम आश्रमात घेण्यात अाली. या बैठकीसाठी सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग सेवाग्राम अाश्रमात अाले हाेते. या अाश्रमात त्यांनी जवळपास दीड तासाचा वेळ घालवला. त्यानंतर वऱ्हाडी जेवणाचा अास्वादही घेतला. जेवणानंतर काँग्रेसच्या या सर्व पदाधिकाऱ्यांनी अापली जेवणाची ताटेही स्वत: धुतली.

सकाळी ११.१५ वाजता राहुल, सोनिया गांधी, मनमोहनसिंग, अशाेक गहलोत, अशोक चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गज नेते आश्रमात दाखल झाले. आश्रमाची पाहणी करून बापूंच्या निवासस्थानी काही काळ मौनही पाळले. त्यानंतर आश्रम परिसरात आयोजित प्रार्थनास्थळी गेले. या वेळी पंडित कुमार गंधर्वांचे नातू भुवनेश काेमकली यांनी भजन सादर केले. आश्रम परिसरातील मोकळ्या जागेत सोनिया, राहुल गांधी व मनमोहनसिंग यांनी १२ वाजताच्या सुमारास बेलाचे वृक्ष लावून त्यांना पाणी दिले. त्यानंतर त्यांनी जेवण केले. या वेळी सेवाग्रामच्या प्रथम नागरिक असलेल्या काँग्रेसच्या महिला सरपंच रोषणा जामलेकर यांना आश्रमातील प्रार्थनास्थळावर सुरक्षा रक्षकासह नेत्यांनी अडवले हाेते. जेवणानंतर माधव भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकारिणीच्या बैठकीला ते गेले.

राहुल गांधी चहा घेतील म्हणून चहावाल्याची प्रतीक्षा
कार्यकारिणीची बैठक समाप्त होताच राहुल गांधी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ असलेल्या महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करत अभिवादन केले. त्यानंतर रामनगरात आयोजित सभास्थळापर्यंत सुमारे ४ किलोमीटरच्या पदयात्रेत त्यांनी सहभाग नोंदवला.

पदयात्रेदरम्यान वर्धा शहरातील अंबिका चौकात राहुल गांधी चहाचा स्वाद घेणार असल्याने चहा विक्रेता रमेश पाटीदार (रा. सामलिया राजस्थान) यांच्याकडून स्पेशल चहा ५० कप व साधा चहा ३०० कप बनवण्यात आला हाेता. मात्र, राहुल गांधी चहा न पिताच निघून गेले.
Government in country is not of Gandhi's thought : Rahul gandhi

Post a Comment

 
Top