0
 • नागपूर- वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे काँग्रेसची अखिल भारतीय कार्यसमितीची बैठक तसेच वर्धा येथील जाहीर सभेच्या तयारीसाठी काँग्रेसमधील दोन गटांच्या दोन स्वतंत्र बैठका आयोजित होण्याचा प्रकार घडला. असंतुष्ट गटाचे नेतृत्व करीत असलेले माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी तयारीची वेगळी बैठक घेऊन पक्षाच्या राज्यातील नेतृत्वावर विश्वास नसल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले.


  वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे २ अॉक्टोबर रोजी काँग्रेसची अखिल भारतीय कार्यसमितीची बैठक होत आहे. या बैठकीसाठी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी तसेच राष्ट्रीय पातळीवर सर्व नेते येत आहेत. राहुल गांधी यांची जाहीर सभादेखील वर्धा येथे होणार आहे. त्यासाठी नागपुरात नियोजन सुरू आहे. मात्र, एवढ्या मोठ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवरही काँग्रेसमधील गटबाजी कायम असून त्याचे दर्शन रविवारी घडले. शहर काँग्रेसच्या वतीने तयारीसाठी देवडिया काँग्रेस भवनात बैठक आयोजित झाली.

  त्या बैठकीस माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या नेतृत्वातील असंतुष्ट गट अनुपस्थित राहिला. या गटाने पालिकेतील पक्ष कार्यालयात स्वतंत्र बैठक घेऊन आढावा घेतला. या बैठकीला डॉ. राऊत यांच्यासह माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आमदार अशोक धवड यांच्यासह अनेक नेत्यांनी हजेरी लावली. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी देवडिया काँग्रेस भवनात आयोजित केलेल्या विशेष बैठकीसही हा गट अनुपस्थित राहिला.

  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सध्याच्या शहर कार्यकारिणीतील नेत्यांचीच री अोढण्याचे धोरण ठेवले असल्याने त्यांच्याशी आमची बांधिलकी नसून आमची बांधिलकी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाशी असल्याचे सांगत असंतुष्ट नेत्यांपैकी एकाने आपली भूमिका स्पष्ट केली. या असंतोषामुळे या नेत्यांवर काय कारवाई होणार, याकडे लक्ष लागले आहे.

  वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे २ अॉक्टोबर रोजी काँग्रेसची अखिल भारतीय कार्यसमितीची बैठक होत आहे.

  • Grouping in Congress before national meeting

Post a comment

 
Top