पोलिस उपविभागीय अधिकारी अजित टिके यांच्याबरोबर झालेल्या बैठकिनंतर अखेर पर्यटकांच्या सुरक्षिततेची हमी दिल्यानंतर महाबळेश्वर नगरपालिकेचे वेण्णा धरणावरील बोट क्लब सुरु. महाबळेश्वर नगरपालिकेच्या ईतिहासात प्रथमच नगरपालिकेला बोट क्लब बंद ठेवण्याची नामुष्की आल्याने शहरात उलट सुलट चर्चा.
महाबळेश्वर गिरिस्थान नगरपालिका येथिल वेण्णा लेक धरणावर उत्पन्नासाठी बोट क्लब चालविते. या बोट क्लबच्या माध्यमातून नगरपालिकेला चांगले उत्पन्न मिळत असते. या बोट क्लबच्या बोटींची देखभाल व दुरुस्ती व वेण्णालेक बोट क्लब येथिल जेट्टीची देखभाल ही मॅप्रो या स्थानिक कंपनीकडे देण्यात आली आहे. गेल्याच महिन्यात येथिल बोटींच्या दुरुस्तीबाबत नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्याकडे अहवाल देण्यात आला होता. परंतू त्यानंतर याबाबत कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने येथिल पर्यटकांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. याबाबत नुकतीच बातमी प्रसिध्द झाल्याने पोलिसांनी या परिसराचे पूर्ण चित्रीकरण करुन नगरपालिकेला बोट क्लब बंद करण्याचे निर्देश दिले होते. बोट क्लब बंद करण्याच्या काढलेल्या आदेशाने पालिकेला खडबडून जाग आली व त्याची तारांबळ उडाली. महाबळेश्वर पोलिस स्टेशनचे पी.एस.आय बालाजी गायकवाड यांनी पोलिस निरिक्षक दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली होती. बोट क्लब बंद झाल्याने पालिकेचे कर्मचारी व नगरसेवकांनी त्वरीत पोलिस स्टेशन येथे धाव घेतली. यावेळी पोलिस निरिक्षक नाळे यांनी वाई येथे उपविभागीय अधिकारी अजित टिके यांच्याकडे त्यांना परवानगीसाठी पाठविले. वाई येथिल उपविभागीय अधिकारी अजित टिके यांच्या बरोबर झालेल्या बैठकीमध्ये पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उपाय योजना करुन व्यवसाय करावा अश्या सूचना केल्या व याबाबत पालिकेकडून सुरक्षिततेची काळजी घेण्याचे लेखी जबाबदारी घेऊन त्यांना बोट क्लब चालू करण्याची परवानगी दिली. या संपुर्ण प्रक्रियेचे पुर्तता करुन आज अखेर पर्यटकांना सुरक्षिततेसाठी लाईफ जॅकेटसह बोटींग करण्यासाठी बोट क्लब सुरु कण्यात आले.
महाबळेश्वर नगरपालिकेच्या ईतिहासात प्रथमच बोट क्लब बंद ठेवण्याची नामुष्की आल्याने शहरात याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Post a Comment