औरंगाबाद - जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यात झालेले १५ सिमेंट नाला बंधारे निकृष्ठ असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाल्यानंतर आता या कामांची अपहारित रक्कम किती आणि दोष निश्चितीसाठी दक्षता व गुण नियंत्रण पथकाकडून तपासणी करण्याचे आदेश जलसंधारण विभागाचे आयुक्त दीपक सिंघला यांनी दिले आहेत. २०१६-१७ या वर्षात गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यात जलसंधारण विभागाने १५ सिमेंट नाला बंधाऱ्यांची कामे केली होती. या पंधरा कामांची किंमत जवळपास दोन कोटी रुपये होती. बंधाऱ्यांची कामे निकृष्ठ झाल्याबद्दल 'दिव्य मराठी'ने सातत्याने बातम्या प्रकाशित केल्या. काही जणांनी तक्रारीही केल्या होत्या. त्यानंतर जलसंधारण विभागाने या कामांच्या चौकशीसाठी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची समिती नेमली. जलसंधारण आयुक्त आणि अधीक्षक अभियंत्यांनी काही बंधाऱ्यांची पाहणी केली होती. या पाहणी आणि चौकशीत १५ बंधाऱ्यांच्या कामांचा दर्जा निकृष्ठ असल्याचे उघड झाले. त्यानंतर तत्कालीन कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांची परभणी येथे बदली तर दोन उपविभागीय अभियंते आणि दोन कनिष्ठ अभियंत्यांना निलंबित करण्यात आले.
दरम्यान, या बंधाऱ्यांच्या कामात एकूण किती रुपयांचा अपहार झाला असेल, याचा छडा लावण्यासाठी आयुक्तांनी या सर्व बंधाऱ्यांची तांत्रिक तपासणी करण्याचे आदेश दक्षता व गुण नियंत्रण पथकाला दिले आहेत. या तपासणीनंतर अधिकाऱ्यांवर व्यक्तीश: दोष निश्चित होईल. त्यानंतर फौजदार गुन्हे आणि विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त दीपक सिंघला यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना दिली आहे.काळे यांचे सर्व्हिस बुक, एलपीसी न देण्याच्या सूचना
या गैरव्यवहारामध्ये प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या तत्कालीन कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांची परभणी येथे बदली करण्यात आली आहे. मात्र, हा बदली आदेश निघण्यापूर्वीच जलसंपदा विभागाने त्यांची पैठण येथे जायकवाडी प्रकल्पावर बदली केली आणि एकतर्फी रुजूही करून घेतले. काळे यांना जलसंधारण विभागाने रिलिव्ह लेटर दिलेले नसतानाही जलसंपदा विभागाने काळेंना पैठण येथे एकतर्फी रुजू करून घेतले. याप्रकरणी काळे जर परभणी येथे नव्याने रुजू झाले नाही, तर त्यांना सेवापुस्तिका आणि मागील वेतन प्रमाणपत्र (एलपीसी) देऊ नयेत, अशा सूचना जलसंधारण आयुक्तांनी अधीक्षक अभियंत्यांना दिल्या आहेत.काळे जलसंपदा विभागाच्या बैठकीत : जायकवाडी आणि वरच्या धरणांतील पाणीवापराचे नियोजन करण्यासाठी गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयात सोमवार, १५ ऑक्टोबर रोजी महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीलाही जलसंपदा विभागात एकतर्फी रुजू झालेले कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे हजर होते.रिलिव्ह लेटर मिळाले नाही
जलसंधारण विभागाचा बदली आदेश येण्याच्या अगोदरच माझी पैठण येथे जलसंपदा विभागाने बदली केलेली आहे. त्या आदेशाच्या आधारे मी रुजू झालो. माझा जलसंधारणचा चार्ज कुणाकडे द्यायचा, याचा निर्णय नाही. अद्याप रिलिव्ह लेटर मिळालेले नाही. पैठण येथे रुजू झाल्यामुळे परभणी येथे जाण्याचा प्रश्नच नाही. राजेंद्र काळे, कार्यकारी अभियंता
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment