0
  • औरंगाबाद- मुंबईहून आलेल्या जेट एअरवेजच्या विमानाला बुधवारी पक्ष्याची धडक बसल्यानंतर उडालेल्या गोंधळानंतर गुरुवारी विमान वाहतूक सुरळीत राहिली. मात्र, औरंगाबाद विमानतळावर पक्षी धडकल्याचा दावा करणाऱ्या जेट एअरवेजने गुरुवारी रात्रीपर्यंत याप्रकरणी तक्रार दिली नव्हती. यामुळे नेमकी घटना कोठे घडली याबाबतचा सस्पेन्स कायम आहे.


    बुधवारी मुंबईहून औरंगाबादकडे पहाटे ६:२० वाजता १६५ प्रवासी घेऊन आलेल्या जेट एअरवेजच्या विमानाला पक्षी धडकल्याची घटना घडली होती. यामुळे हे विमान रद्द केले. याप्रकरणी जेट एअरवेज आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. विमानतळाभोवताली असणाऱ्या वस्ती आणि दुकानांमुळे पक्षी तेथे येतात. यामुळेच ही घटना घडल्याचे जेटचे म्हणणे होते, तर अशी घटना औरंगाबाद विमानतळावर घडलीच नसल्याचे विमानतळ प्राधिकरणाचे निदेशक डी. जी. साळवे म्हणाले. अशा घटना घडल्यावर विमान कंपनी लगेच प्राधिकरणाकडे तक्रार करते. मात्र, वारंवार विचारणा करूनही जेटने गुरुवार रात्रीपर्यंत लेखी तक्रार केली नव्हती. जर ही घटना औरंगाबादेत घडली असेल तर जेट तक्रार का करत नाही, असा साळवे यांचा सवाल आहे. तसेच पक्षी धडकल्याचे समजताच वैमानिकाने रेडिओ टेलिफोनद्वारे टॉवरला कळवणे आवश्यक हाेते. तशी तक्रारही झालेली नाही, असे साळवे म्हणाले. याबाबत जेट एअरवेजच्या प्रतिनिधींशी बोलण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. कंपनीच्या कॉर्पाेरेट कम्युनिकेशनला मेल केला असता त्याचेही उत्तर मिळाले नसल्याने जेटची बाजू समजली नाही. दरम्यान, गुरुवारी शहरात येणारी पाचही विमाने वेळेत आली आणि गेली.

    आज महत्त्वाची बैठक 
    चार महिन्यांत दुसऱ्यांदा पक्षी धडकण्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी विमानतळ प्राधिकारणाने एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. यात मनपा, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस खाते, नागरी कृती समिती यांच्यासह सर्व एअरलाइन्स कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील.
    Jet not resiater complaint on second day also

Post a comment

 
Top