0
शाहूनगरीला ऐतिहासिक परंपरेचा वारसा आहे. याच शाहूनगरीत राजघराण्याने रयतेच्या मुलामुलींना शिक्षण मिळावे यासाठी स्वतःची इमारत शाळेसाठी दिली व तेथे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल सुरु झाले त्याला आता काही वर्षात 200 वर्षे पूर्ण होतील. या ऐतिहासिक इमारतीला हेरिटेज दर्जा मिळाला. मात्र, या ऐतिहासिक वास्तूकडे आणि शाळेकडे दुर्लक्ष झाल्याने वास्तूसह शाळेचीही दूरवस्था झाली असून याकडे गांभीर्याने लक्ष देवून प्रतापसिंह हायस्कूलला गतवैभव प्राप्त करुन देण्याची गरज आहे. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीव नाईक निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी प्रयत्न सुरु केले असून आगामी शैक्षणिक वर्षात प्रतापसिंह हायस्कूलचे रुपडे पाटललेले सातारकरांना पहावयास मिळेल. 
   ज्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये श्रीमंत छत्रपती आण्णासाहेब भोसले, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज भोसले, श्रीमंत पंतप्रतिनिधी भवानराव श्रीनिवासराव यांच्यासह देशाची राज्यघटना लिहिणाऱया डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुप्रिम कोर्टाचे न्यायाधीश पी. बी. गजेंद्रगडकर यांच्यासह अनेक अधिकारी, उद्योगपती, समाजसेवक, कलावंतांचे शिक्षण झाले त्या हायस्कूलची अवस्था आजमितीस बकाल आहे. 1820 साली श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी स्थापन केलेली ही पाठशाळा होती. 1851 साली त्याचे रुपांतर प्रतापसिंह हायस्कूलमध्ये झाले. या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये साताऱयासह देशाच्या राजकारण, समाजकारण, उद्योगविश्वासह सांस्कृतिक क्षेत्राला दिशा देणारी व्यक्तीमत्वे घडली. त्यांनी याच हायस्कूलमध्ये मिळालेल्या संस्कार शिदोरीवर पुढे समाजासाठी भव्यदिव्य अशी कामगिरी करत प्रतापसिंह हायस्कूलचा नावलौकिक वाढवला.
   प्रतापसिंह हायस्कूलच्या इमारतीला हेरिटेज वास्तूचा दर्जा मिळाल्यामुळे तिथे सुधारणा करण्यात उलट अडचणी येवू लागल्या. ज्या हायस्कूलने एकेकाळी वैभवाच्या खाणाखुणा अंगावर मिरवल्या त्या वास्तूची देखभाल व दुरुस्तीअभावी हेळसांड सुरु आहे. ही वस्तुस्थिती नजरेस आल्यानंतर सातारा जिल्हा परिषदेचे कार्यतत्पर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्यासह अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी प्रतापसिंह हायस्कूलला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरु केले आहेत.
   नवीन इमारतीसाठी 25 लाखाचा निधी
सध्या असलेल्या इमारतीची दूरवस्था पाहता हायस्कूलच्या वसतीगृहाच्या इमारतीची दुरुस्ती करुन तिथे शाळा भरवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी शासनाकडून 25 लाखाचा निधीही मंजूर झाला असून आगामी शैक्षणिक वर्षात या जुन्या इमारतीची दुरुस्ती करुन त्याठिकाणी अद्यावत सोयीसुविधा पुरवून प्रतापसिंह हायस्कूलची यशोगाथा पुढे सुरु ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
   ग्रंथालयासाठीही 50 लाखाचा निधी आला
ज्या हायस्कूलने भारताला एक घटनाकार दिला. त्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती जतन करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून प्रतापसिंह हायस्कूलला अद्यावत ग्रंथालय उभारणीसाठी 50 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तो समाजकल्याण विभागाकडे आला आहे. मात्र, या ऐतिहासिक इमारतीत या सुधारणा करताना हेटिटेज समितीची परवानगी आवश्यक असून ती मिळवण्यासाठी सातारा जिल्हा परिषद प्रयत्न करत आहे.
  पूर्ण वेळ मुख्याध्यापकही मिळाला
प्रतापसिंह हायस्कूलच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती एस. जी. मुजावर यांनी सातारा जिल्हा परिषदेचे असलेले हे जिल्हय़ातील एकमेव हायस्कूल दर्जेदार होण्यासाठी विविध उपक्रम राबवले होते. मात्र, त्यांना उपशिक्षणाधिकारी पदी पदोन्नतीनंतर हायस्कूलला पूर्ण वेळ मुख्याध्यापक नसल्याने हायस्कूलच्या निर्णयप्रक्रियेकडे दुर्लक्ष झाले होते. आता लवकरच हायस्कूलला पूर्ण वेळ मुख्याध्यापक देण्यात आला असून आगामी काळात हायस्कूलला उर्जितावस्था येण्यासाठी जे प्रयत्न होणार आहेत त्यात त्यांना भरीव योगदान द्यावे लागणार आहे.
  तातडीने करावयाच्या सुविधा
सध्या ज्या इमारतीत हायस्कूल भरत आहे. त्याठिकाणी प्रत्येक वर्गाला स्वतंत्र खोली असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच तिथे स्वच्छतागृह नसल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांची देखील गैरसोय होत आहे. शेजारी असणाऱया नगरपालिकांच्या शाळांचा स्वच्छतागृहांचा वापर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असल्यामुळे शाळेच्या पटसंख्येवर त्याचा परिणाम झाला आहे. जे हायस्कूल गुणवत्तेतही अग्रेसर होते तो दर्जा आगामी काळात निर्माण करण्यासाठी आता प्रयत्न सुरु झाले आहेत.
  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची शाळा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये शिकले. या गोष्टीचे सर्वांना अप्रुप आहे. त्यासाठी शासनाने खास शाळा प्रवेशदिनही सुरु केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेत शिकले ती शाळा कशी असेल हे पाहण्यासाठी विविध मान्यवरांसह राज्यभरातून पर्यटकांबरोबरच शिक्षणप्रेमी प्रतापसिंह हायस्कूलला भेटी देत असतात. लवकरच या शाळेचे रुपडे पालटणार असून नागरिक सहभागातूनही शाळेत खूप काही नवीन सुविधा करता येतील.
  जुन्या इमारतीत चालताहेत अवैध गोष्टी

ऐतिहासिक गतवैभवाच्या खुणा अंगाखाद्यांवर मिरवत प्रतापसिंह हायस्कूलची तसेच वसतीगृहाची इमारत सातारकरांसाठी प्रेरणादायी वास्तू आहेत. राजघराण्याने ही दौलत सातारकरांच्या ताब्यात सोपवली आहे. मात्र, काही निर्लज्य सातारकर जुन्या इमारतीचा वापर अवैध कारणांसाठी करत असल्याने तो पवित्र परिसर कलंकित होत आहे. या बाबी रोखण्यासाठी सातारा पालिका, जिल्हा परिषदेने ठोस उपाय योजना करण्याची गरज आहे

Post a Comment

 
Top