0
  • मुंबई - नुकत्याच पार पडलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या अयोध्या दौऱ्याच्या मुद्द्यावरून मनसेने शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. अयोध्या वारीसाठी शुभेच्छा पण राज्यातील प्रश्नांचे काय अशा अशायाचे पोस्टर थेट शिवसेना भवनासमोर लावत मनसेने शिवसेना नेतृत्वाला दहा प्रश्न विचारत खिजवले आहे.

    सध्या राम मंदीराच्या मुद्द्यावरून देशातील राजकीय वातावरण तापू लागले असतानाच राज्यातील राजकारणातही हा मुद्दा गाजू लागला आहे. दोन दिवसांपूर्वीच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर तोंडसुख घेताना अयोध्येतील राम मंदीराच्या मुद्द्याला हवा दिली होती. आपल्याला राममंदीर बांधणे जमत नसेल तर अाम्ही बांधू, असे थेट आव्हान देत पुढील महिन्यातील अयोध्या भेटीची तारीखही जाहीर केली होती. ठाकरेंच्या या भूमिकेमुळे भाजपची कोंडी झालेली असतानाच, मनसेने याच मुद्द्याचा वापर करत शिवसेनेवरच टीकेचे बाण सोडले आहेत. अयोध्या वारीसाठी शुभेच्छा पण राज्यातील प्रश्नांचे काय, असा सवाल करणारे पोस्टर लावत मनसेने शिवसेनेला चिथावले आहे. यापुर्वीही अनेक मुद्द्यांवर थेट सेना भवनासमोर पोस्टरबाजी करत मनसेने शिवसेनेला खिजवले आहे. दरम्यान, मनेसच्या या पोस्टरबाजीवर शिवसेना काय उत्तर देते हे पहाणे आत्सुक्याचे ठरणार आहे.
    काय आहेत मनसेच्या पोस्टरवरचे सवाल? 
    शिवसेना भवनासमोरील फुटपाथवर दर्शनी भागात लावलेल्या या पोस्टरवर अयोध्या वारीसाठी शुभेच्छा या मथळ्याखाली पुढील प्रश्न विचारण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील रस्ते खड्डेमुक्त कधी होणार? महागाई कमी होणार का? महाराष्ट्रात महिला सुरक्षित राहणार का? बेरोजगारांना रोजगार कधी मिळणार? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार का? शेतमालाला हमी भाव मिळणार का? राज्यातील दुष्काळ संपणार का? मोकळ्या जागांवरील अतिक्रमण थांबणार का? महापालिकेतील भ्रष्टाचार संपणार का? अशा प्रश्नांची सरबत्तीच मनसेतर्फे करण्यात आली आहे. सर्वात शेवटी, खिशातले राजीनामे केव्हा बाहेर पडणार? असा खोचक सवालही या पोस्टरद्वारे विचारण्यात आला आहे.mns banner front of shivsena bhavan

Post a Comment

 
Top