0
फलटण तालुक्यातील नांदल गावच्या हद्दीत मिरगाव बाजुकडे पूर्वबाजुस असलेल्या वनक्षेत्रात डोक्यात दगड घालून एका अनोळखी इसमाचा खून दोन ते तीन दिवसांपूर्वी झाला असल्याची घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली आहे.   संपूर्ण मृतदेह सडल्याने दुर्गंधी पसरल्यामुळे ही घटना उघडकीस आली असून लोणंद पोलीस व फलटण ग्रामीण पोलीस घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अहवालानंतर हा मृत्यू नक्की कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे. तसेच मृतदेह कोणाचा आहे, खून कोणी केला व कशासाठी केला याबाबत पोलीस तपास करत आहेत.
  लोणंद-फलटण रस्त्यावरील मिरगाव नांदल गावच्या हद्दीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह पालथ्या अवस्थेत पडलेला आढळला. त्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता ऊस तोड कामगार किंवा मजुरी करणारी व्यक्ती असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी दिली आहे. मृतदेह सडल्याने दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना समजताच फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके व लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे व त्यांच्या सहकाऱयांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. या अनोळखी इसमाचा डोक्यात दगड घालून खून केला असून वनक्षेत्र परिसरात प्रंचड दुर्गंधी पसरल्याने पोलीस व ग्रामस्थांना ओळख पटवण्यासाठी अडचणी येत आहेत.
  खून झालेल्या इसमाची ओळख पटविण्यासाठी पोलीस ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रयत्न करीत आहेत. या इसमाचा खून नक्की कोणत्या कारणावरून, कधी झाला, कोणी केला? याचा तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, अनोळखी व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पोलीस घेऊन आले असून त्याप्रमाणे माहिती घेण्यासाठी व कोणत्या कारणावरून हा खून झाला आहे याबाबत इतरत्र पोलिसांना पाठवले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश चोपडे यांनी दिली आहे. रात्री उशिरापर्यंत ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू होते.

Post a Comment

 
Top