राम मंदिर बांधण्याच्या मागणीसाठी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे प्रमुख प्रवीण तोगडिया थेट अयोध्येत दाखल झाले आहे. त्यामुळे प्रशासनापुढे त्यांना रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यातच त्यांनी शरयू नदीच्या किनारी बोलताना केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. राम मंदिराचा भाजपला विसर पडला असून निवडणुका झाल्यानंतर कोणीही अयोध्येत फिरकले नाही. राम मंदिर हाही निवडणूक जिंकण्यासाठीचा जुमला होता, अशा शब्दांत तोगडियांनी भाजपवर निशाणा साधला. 

तोगडिया हे कार्यकर्त्यांसह रामकोट परिक्रमा आणि राम मंदिर बांधण्यासाठी शरयू किनारी संकल्प सभा घेणार आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या समस्यांत वाढ झाली असून अयोध्येत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रशासनाने तोगडियांशी केलेल्या चर्चेनंतर रामकोट परिक्रमेचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. परंतु, आंहिप कार्यकर्त्यांसह तोगडिया संकल्प सभेसाठी शरयू नदीकिनारी जात असताना पोलिस आणि कार्यकर्त्यांत वादावादी झाली. यामध्ये काही आहिंप कार्यकर्ते जखमी झाले आहेत.
बहुमताने सत्तेवर येऊनही राम मंदिराचा विसर
सोमवारी जिल्हा प्रशासनाकडून शरयू नदीच्या किनारी सभेस परवानगी मिळाली नाही. त्यामुळे तोगडियांनी तिथेच समर्थकांना संबोधित केले. ३२ वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि विश्व हिंदू परिषद एकाच मुद्द्यावर लढत आहेत. संसदेत कायदा करून राम मंदिर बांधण्याची मागणी ते करत होते. परंतु, आता पूर्ण बहुमताने सत्ता मिळूनही त्यांना राम मंदिराचा विसर पडला आहे, असा आरोप तोगडियांनी केला.
दिल्लीत ५०० कोटींचं भाजप कार्यालय उभारलं, पण..
भाजपने दिल्लीत ५०० कोटींचे पक्ष कार्यालय बनवले. परंतु, आजही रामलला तंबूतच आहेत, अशा शब्दांत तोगडियांनी भाजपला लक्ष्य केले. तसेच अयोध्येत राहण्यापासून प्रशासनाने आपल्याला रोखले. आमच्या समर्थकांना खाण्या-पिण्याचं साहित्यही अयोध्येत आणू दिलं नाही, असा आरोप सरकारवर केला.
शिवसेना नेते संजय राऊत तोगडियांना भेटणार
एकीकडे राम मंदिरासाठी तोगडियांनी अयोध्येत ठाण मांडले आहे. तर दुसरीकडे शिवसेनाही राम मंदिराच्या मुद्द्यावरून आक्रमक झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला अयोध्येत जाणार आहेत. तत्पूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत फैजाबादला पोहोचले आहेत. ते प्रविण तोगडियांची भेट घेण्याची शक्यता आहे.
काँग्रेस मुक्त भारत ऐवजी काँग्रेस युक्त भाजप झाला
तोगडिया यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीकास्त्र सोडले. काँग्रेस मुक्त भारतची घोषणा देत-देत काँग्रेस युक्त भाजप करून बसले आहेत. काँग्रेसमध्या ज्यांना कोणी विचारत नव्हते, अशांना भाजपने मोठ्या पदांवर आणून बसवले आणि मूळ भाजप कार्यकर्ता मात्र राम मंदिराचे स्वप्न बघत बसला, असे तोगडिया म्हणाले.
Post a Comment