0
अमरावती - शिक्षण संस्थांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांच्या सरकारी जमिनींवर डल्ला मारण्याचा डाव आमदार रवी राणा यांनी आखला असून, साईनगरच्या पाठोपाठ आता बडनेराच्या विजय मिलचा भुखंड गिळंकृत करण्याची कारवाई त्यांनी सुरू केली आहे. बडनेरा नवीवस्ती येथील विजय मिलची जागा राणांच्या घशात न घालता त्या जागेवर गरिबांची घरे आणि रोजगार मिळावा म्हणून उद्योग सुरू करण्यात यावा, अशी मागणी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.

एकेकाळी बडनेरा शहराचे भूषण असलेल्या विजय मिलला अखेरची घरघर लागल्यानंतर या जागेवर पुन्हा मोठा औद्योगिक प्रकल्प येऊन तिथे लोकांना रोजगार मिळावा, अशी जनतेची सातत्याने मागणी आहे. शहरातील विविध संस्थांनी, विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी वर्षानुवर्षे ही मागणी रेटली आहे. शिक्षण संस्थेच्या नावाखाली शहरातील मोक्याच्या जागेवरचे कोट्यवधी रुपयांच्या किंमतीचे भूखंड लाटण्याचा धंदा आमदार राणा यांनी सुरू केला आहे. पहिल्यांदा आमदार रवी राणा आणि एका माजी आमदाराच्या संयुक्त प्रयत्नातून ही जागा बळकवण्याची प्रक्रिया सुरू केली. तेव्हा, बडनेरातील काही राजकीय कार्यकर्त्यांनी त्यावर आक्षेप देखील घेतला होता. आपल्या दहा वर्षांच्या आमदारकीच्या काळात रवी राणा हे विजय मिलच्या जागेवर एखादा मोठा प्रकल्प आणून लोकांना रोजगार मिळवून देऊ शकले असते. मात्र, आमदार राणा यांनी हेतुपुरस्सर विजय मिलची जागा पडीत ठेवली. स्वतःच्या निवडणुकीच्या वेळी आणि मनपा निवडणुकीत खोटी आश्वासने दिली. आता बडनेराच्या जनतेला गाफील ठेऊन विजय मिलची जागा गिळण्याचा डाव रवी राणा यांनी आखला असल्याचे कुळकर्णी यांचे म्हणणे आहे. भूखंडाचे श्रीखंड लाटण्याच्या प्रकरणी शिवराय कुळकर्णी यांनी आमदार रवी राणा यांच्यावर आरोपांची तोफ डागली आहे. राणा यांनी माझ्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी लाभार्थी चेले- चपाटे समोर करण्यापेक्षा स्वतः समोर यावे, असे आव्हान कुळकर्णी यांनी दिले आहे. विविध संस्थांच्या नावाखाली शासकीय जमिनी हडपण्याच्या कामात रवी राणा पारंगत झाले असल्याचा आरोप शिवराय कुळकर्णी यांनी केला आहे. यापूर्वी त्यांनी साई नगर येथील पाच एकर जमीन अशोक नारायणजी राणा हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या संस्थेच्या नावाने नियमबाह्य पद्धतीने बळकावली. अनेक सामाजिक संस्थांचे प्रकल्प प्रामाणिकपणे सुरू असताना त्यांना जमिनी मिळत नाही. आता राणा आपला राजकीय दबाव वापरून बडनेरा येथील कॉलेज बंगला नावाने ओळखल्या जाणाऱ्या पाच एकर जमिनीचा मालकी हक्काने ताबा घेण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी या जागेवर आरडीआयके कॉलेज होते. नंतर काही वर्षे दुसरे महाविद्यालय होते. आता याच जागेसाठी आवश्यक असणाऱ्या ना हरकत प्रमाणपत्रासह जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. आमदार राणा यांनी स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून बडनेरा साईनगर भागातील मौजे अमरावती पेठ येथे तंत्रनिकेतन महाविद्यालयासाठी जमीन मिळवली. त्या जमिनीवर तंत्रनिकेतन सुरू न करता राणांनी दिल्ली पब्लिक स्कूल केले. त्यासाठी भव्य इमारत उभारून शासकीय जमिनीवर २८ कोटी रुपये कर्जाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्या मदतीने पंजाब नॅशनल मुंबई बँकेचे कर्ज मिळविले आहे. या सर्व प्रकरणात राणा यांनी महसुली नियम धाब्यावर बसवले आहेत. या जागेवर तंत्रनिकेतन न आल्यास वर्षभराच्या आत जागा परत करण्याच्या शासनाच्या अटी शर्तीचा भंग करून ही जागा गिळली आहे. साईनगर येथे मिळालेल्या पाच एकर जमिनीचा गैरवापर होत असतानाच आमदार राणा यांच्याकडून दबावतंत्राचा उपयोग करून विविध शासकीय विभागांचे ना हरकत प्रमाणपत्र मिळवणे सुरू झाले आहे. मूळची विजय मिलची असलेली रेल्वे लाईनला लागून असलेली ही पाच एकर जागा मालकीहक्काने गिळंकृत करण्यासाठी आयुक्त कार्यालयाचा हवाला देऊन दबावतंत्राद्वारे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यात येत आहेत. बडनेरा विधानसभा मतदार संघात येत असलेल्या महसुली ई-क्लास असलेल्या जागा आमदार राणा यांच्याकडून विविध संस्था आणि वैयक्तिक नावांवर लाटण्याचा प्रकार सर्रासपणे सुरू झाला आहे. एमआयडीसी भातकुली, एमआयडीसी अमरावती व नांदगाव पेठ आणि बीएसएनएलची जागा परिवारातील सदस्यांच्या नावावर लाटण्यात येत आहेत. संस्था समोर करून भूखंडांचे श्रीखंड लाटण्याचा गैरप्रकार जिल्हा प्रशासनाने थांबवावा, अशी मागणी शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.
शिवराय कुळकर्णी यांनी विचार करुन बोलावे
कोणताही आरोप करण्यापूर्वी भाजपचे प्रदेश प्रवक्ते असलेले शिवराय कुळकर्णी यांनी अभ्यास करून विचारपूर्वक बोलावे. जागा लाटली असेल तर कुळकर्णी म्हणतील तसे करेल. कुळकर्णी यांच्याकडून खोटे आरोप केले जात अाहे. त्यांनी खरे ते बोलावे. आरोप करताना विचार करावा. नायब तहसीलदार यांच्या पत्रानंतर जिल्हाधिकाऱ्यांचे देखील पत्र निघाले. शिवाय अनेक पत्र निघाले आहे. ती कुळकर्णींनी पहावीत. रवी राणा, आमदार बडनेरा विधानसभा मतदार संघ

शहरातील विविध संस्थांनी, विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी वर्षानुवर्षे ही मागणी रेटली आहे.

  • News about Badner vijay meal land

Post a Comment

 
Top