नवी दिल्ली- अमेरिकेचे इशारे झुगारून भारत-रशियादरम्यान शुक्रवारी ४० हजार कोटी रुपयांचा एस-४०० हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणेच्या खरेदीचा करार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी या करारावर दिल्लीत १९ व्या शिखर परिषदेत स्वाक्षऱ्या केल्या.
दोन्ही देशांदरम्यान एकूण ८ करार करण्यात आले. यात गगनयान मोहीम, अवकाशातील मानव मोहिमा, पर्यावरण संरक्षणासाठी कार्बन उत्सर्जन, आण्विक ऊर्जा, रेल्वे अशा क्षेत्रांचा समावेश आहे. एस-४०० यंत्रणा भारताला २०२० पासून मिळणे प्रारंभ होईल. पुतीन म्हणाले की, दोन्ही देश दहशतवाद आणि ड्रग तस्करीविरुद्धच्या लढाईत परस्परांना सहकार्य करतील.
रेल्वे स्पीड प्रोजेक्टमध्येही दोन्ही देशांत सहकार्य
भारतीय रेल्वे मंत्रालय आणि रशियन रेल्वेने एका करारावर स्वाक्षरी केली असून यात नागपूर-सिकंदराबाद विभागात स्पीड अपग्रेडेशन, भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि वाहतूक शिक्षणात रशिया सहकार्य करणार आहे. यासाठी २४ डिसेंबर २०१५ रोजी पुढील करार केला जाईल.

Post a comment