0
 • जळगाव- शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्याचा गुरुवारी मध्यरात्री इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून संशयास्पद मृत्यू झाला. चौथ्या मजल्यावर मोबाइलवर बोलत असल्याचे विद्यार्थ्यांनी रात्री पाहिले होते.त्यानंतर थेट सकाळी त्याचा मृतदेहच आढळला. शुक्रवारी सकाळी वसतिगृहातील एक विद्यार्थी तोंड धुण्यासाठी बाहेर आला त्यावेळी ही घटना उघडकीस आली. याेगेश अजारिया पावरा (वय २५, रा. राेशमा, ता. धडगाव, जिल्हा नंदुरबार) असे अात्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एम.एस.डब्ल्यू.मध्ये प्रथम वर्षात शिक्षण घेत होता.


  दरम्यान,प्रवेश घेतल्यापासून भोजनाचे पैसे न मिळाल्यामुळे चिंतेत असलेल्या योगेशने हे टोकाचे पाऊल उचलले अशी माहिती वसतिगृहातील त्याच्या विद्यार्थी मित्रांनी दिली. आदिवासी प्रकल्प विभागाचे हे वसतिगृह विद्यापीठाच्या आवारात असून आत्महत्येचे वृत्त सकाळी वाऱ्याच्या वेगाने पसरताच वसतिगृहातील संतप्त विद्यार्थ्यांनी योगेशच्या मृतदेहाजवळ ठिय्या देऊन आंदोलन केले. रेक्टरला घेराव घालून जाब विचारला.तसेच प्रकल्प अधिकाऱ्यासही धारेवर धरले.

  अादिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात खाेली क्रमांक ३०३ मध्ये योगेश हा मुकेश पावरा व इतर पाच विद्यार्थ्यांसाेबत राहत हाेता. गुरुवारी रात्री याेगेश पावरा याने खासगी मेसवरून जेवणाचा डबा अाणला. शेजारच्या खाेलीत राहणाऱ्या मित्रांसाेबत भाेजन केले. त्यानंतर रात्री ११.३० वाजता ताे वसतिगृहाच्या चाैथ्या मजल्यावरील गच्चीवर गेला. तेथे माेबाइलवर ताे बाेलत हाेता, अशी माहिती त्याच्या खाेलीतील सहकारी मुकेश पावरा याने दिली. सकाळी ६ वाजता अजय पावरा हा वसतिगृहातील विद्यार्थी ताेंड धुण्यासाठी खिडकीजवळ अाला. त्याने खिडकीतून डाेकावून पाहिले असता, त्याला इमारतीच्या अावारात याेगेशचा मृतदेह पडलेला असल्याचे दिसले. त्याने माहिती दिल्यानंतर विद्यार्थी, विद्यार्थिनींनी घटनास्थळी धाव घेतली. याेगेशच्या अात्महत्येला वसतिगृह प्रशासन जबाबदार असल्याचा अाराेप करून त्यांनी मृतदेहाजवळ ठिय्या मांडला. मृत याेगेशचा भाऊ धीरसिंग पावरा हा विद्यापीठात एम.ए. द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत अाहे. त्यानेही घटनास्थळी धाव घेऊन अाक्राेश केला.
  आत्महत्या की तोल जाऊन पडला? 
  योगेश हा वसतिगृहाच्या गच्चीवर मोबाइलवर बोलत होता. मोबाइलवर बोलत असताना त्याचा तोल गेल्याने खाली पडून त्याचा मृत्यू झाला, असाही कयास लावण्यात येत आहे. मात्र मोबाइलवर बोलताना इमारतीवरुन खाली पडला असता तर योगेशच्या मृतदेहाजवळ किंवा इमारतीच्या परिसरात त्याचा मोबाइलही आढळला असता परंतु त्याचा मोबाइल पोलिसांना गच्चीवरील भिंतीवर आढळून आला. त्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी,असाही एक तर्क आहे.

  घटनेनंतर सर्वप्रथम गृहपाल डी .बी. पाटील हे घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास रेक्टर अमोल चव्हाण हे घटनास्थळी पोहोचले. त्यांना विद्यार्थ्यांनी वसतिगृहात असलेल्या असुविधांबाबत जाब विचारला. घटनास्थळी चोपड्याचे पोलिस उपअधीक्षक विजयकुमार चव्हाण, धरणगावचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, कुलसचिव बी. बी. पाटील, यावल आदिवासी प्रकल्पाचे प्रकल्प प्रमुख आर. बी. हिवाळे, समाजकार्य विभागाचे प्राध्यापक व विद्यार्थी पोहोचले होते. विद्यार्थ्यांनी पोलिसांवरही रोष व्यक्त केला. विद्यापीठ प्रशासनाचे अधिकारी लवकर न पोहोचल्याबाबत नाराजी व्यक्त केली. पोलिस उपअधीक्षक चव्हाण यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढली. कुलसचिव बी. बी. पाटील यांनी संवेदना व्यक्त केली.

  दाेषींविरोधात विद्यार्थ्यांची कारवाईची मागणी 
  वसतिगृहात असलेल्या समस्या कधी सोडवणार? याबाबत विद्यार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी हिवाळे यांना विचारणा केली. या घटनेची मंत्रालयापर्यंत दखल घेण्यात आली आहे. आदिवासी विभागाचे सचिव व आयुक्तांना या घटनेबाबत मोबाइलव्दारे माहिती दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

  घरची परिस्थिती हलाखीची,मेससाठीही पैसे नव्हते 
  वसतिगृहात प्रवेश घेतल्यापासून थेट लाभ हस्तांतर योजनेंतर्गत योगेशला भोजन व नाश्त्यासाठी दरमहा ३ हजार ५०० हजार रुपये आतापर्यंत मिळालेले नव्हते. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने मेससाठीही त्याच्याकडे पैसे नव्हते. तो इतर विद्यार्थ्यांना उधार पैसे मागत होता.

Post a Comment

 
Top