भारत व लिंडीज यांच्यातील चौथा वनडे सामना सोमवारी येथे होणार असून अंतिम संघात परिपूर्ण समतोल साधण्याचा प्रयत्न भारतीय संघव्यवस्थापन करणार आहे.
शनिवारी पुणे येथे झालेल्या सामन्यात भारताने पाच स्पेशालिस्ट गोलंदाज खेळविले होते. पण त्याचा फायदा झाला नव्हता. विंडीजने या सामन्यात विजय मिळवून मालिकेत भारताशी 1-1 अशी बरोबरी साधण्यात यश मिळविले. मायदेशात भारताला विंडीजकडून प्रथमच सामना गमवावा लागला होता. मालिका बरोबरीत असल्याने आणि दोन सामने बाकी असल्याने विराट कोहलीच्या टीम इंडियाला सोमवारचा सामना जिंकावाच लागणार आहे. कसोटी मालिकेत विंडीज संघ पूर्णतः निष्प्रभ ठरला होता. पण वनडे मालिकेत त्यांनी फक्त शानदार प्रदर्शन केलेले नाही तर तगडे आव्हानही उभे केले आहे.
तिसऱया सामनयात 43 धावांनी पराभूत झाल्यानंतर कर्णधार कोहलीने संघात योग्य समतोल नसल्याचे म्हटले होते. पण आता केदार जाधवचा समावेश झाल्याने फलंदाजी व गोलंदाजी दोन्हीमध्ये हवी असलेली डेप्थ संघाला मिळणार आहे. ‘समतोल नसला की एका बाजूला तोल ढळतोच. त्यामुळे परिपूर्ण समतोल साधण्याबाबत आम्ही लक्ष केंद्रित केले पाहिजे,’ असे कोहली म्हणाला होता. मध्यफळीची अस्थिरता आणि धोनीचा खराब फॉर्म ही समस्या भारताला भेडसावत आहे. यावर तोडगा काढण्याची गरज असून हे फक्त सोमवारच्या सामन्यासाठीच नव्हे तर पुढील वषी होणाऱया विश्वचषक स्पर्धेआधी ही समस्या लवकर निकालात काढण्याची गरज आहे. विश्वचषकाआधी फक्त 15 सामने भारताला खेळावयास मिळणार आहेत.
टी-20 संघातील स्थान गमवणाऱया धोनीला मर्यादित संधी असल्याने त्याला फॉर्म दाखवून देण्याची गरज आहे, तरच त्याचा विश्वचषकासाठी विचार होऊ शकतो, अशी स्थिती आहे. अम्बाती रायुडूने (22) पुण्यातील सामन्यात सुरुवात चांगली केली होती. पण चौथ्या क्रमांकावर कायमचा दावा करायचा असेल तर धावांमध्ये सातत्य त्याला दाखवून द्यावे लागेल. आधीच्या सामन्यात धोनीआधी पाचव्या क्रमांकावर आलेल्या पंतने नेहमीप्रमाणे आक्रमकता दाखविली आहे. पण आपल्या पहिल्या वनडे मालिकेत त्याला अजून भरीव योगदान देता आलेले नाही. केदार जाधवबाबतची अनिश्चितता संपली असून त्याचे पुनरागमन मध्यफळी भक्कम करू शकेल. तो वारंवार अनफिट ठरत असला तरी देवधर ट्रॉफीतील सामन्यात त्याच्या तंदुरुस्तीची एकप्रकारे चाचणीच झाली आहे. जबरदस्त फटकेबाजीसह त्याची ऑफस्पिन गोलंदाजी नेहमीच उपयुक्त ठरत आली आहे.
शिखर धवन व रोहित शर्मा गेल्या दोन सामन्यात अपयशी ठरले असले तरी त्यांच्याकडून मोठय़ा भागीदारीची अपेक्षा केली जात आहे. कर्णधार कोहलीचा जबरदस्त फॉर्म ही यजमान संघाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. गेल्या तीन सामन्यात त्याने सलग तीन शतके नोंदवून असा पराक्रम करणारा पहिला भारतीय होण्याचा मान मिळविला आहे. सीसीआयवर त्याच्याकडून आणखी एका शतकाची अपेक्षा केली जात असली तरी त्याला संघाकडून सुधारित कामगिरी व्हावी अशी अपेक्षा आहे. गोलंदाजीच्या विभागात बुमराहने शनिवारच्या सामन्यात दीमाखदार पुनरागमन करीत चार बळी मिळविले. पण भुवनेश्वरने हाणामारीच्या षटकांत भरपूर धावा दिल्या. मात्र तो येथील सामन्यात मुसंड मारण्याची अपेक्षा आहे. विंडीजला रोखण्यासाठी यजुवेंद्र चहल व कुलदीप यादव या स्पिनर्सची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.
विंडीजसाठी त्यांचा यष्टिरक्षक शाय होप ही सर्वात मोठी जमेची बाजू ठरली आहे. विशाखापट्टणम (123) व पुणे (95) येथील सामन्यात त्याने दोन महत्त्वाच्या खेळी केल्या आहेत. त्यामुळे येथील सामन्यात आणखी एका मोठय़ा खेळीची त्याच्याकडून अपेक्षा केली जात आहे. याशिवाय शिमरॉन हेतमेरकडूनही मोठय़ा अपेक्षा केल्या जात आहेत. पुण्यातील सामन्यात त्याने चांगली सुरुवात केली होती. पण त्याचे मोठय़ा खेळीत रूपांतर करता आले नव्हते. त्याने पहिल्या दोन सामन्यात 106 व 94 धावांच्या खेळी केल्या होत्या. या दोघांव्यतिरिक्त केरॉन पॉवेल, चंद्रपॉल हेमराज, रोवमन पॉवेल यांच्याकडूनही मोठय़ा खेळी व्हाव्यात अशी विंडीजची अपेक्षा आहे. अनुभवी मार्लन सॅम्युअल्स शनिवारच्या सामन्यात (3 बळी) गोलंदाजीत यशस्वी ठरला होता. पण फलंदाजीत त्याला चमक दाखविता आलेली नाही. याशिवाय कर्णधार जेसन होल्डरही सामना जिंकून देणारे योगदान देण्यास आतुर झालेला आहे. त्यांच्या गोलंदाजांनी पुण्यातील सामन्यात भारताला गुंडाळण्याचा पराक्रम केल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्याची पुनरा
वृत्ती करण्यास तेही उत्सुक झाले आहेत.

Post a Comment