0
प्रभात चित्र मंदिर चौकात खुन्नस दिल्याच्या कारणावरून तडीपार गुंड भानुदास धोत्रे व बापू चांदणे यांनी एकमेकांवर चाकूने वार केल्याची घटना मंगळवारी घडली. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून, या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी पोलिसात दाखल झाल्या आहेत. या प्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

भानुदास लक्ष्मण धोत्रे (रा. शनिवार पेठ, कराड) याने दिलेल्या फिर्यादीवरून बापू जयपाल चांदणे व त्याचा चुलतभाऊ गोट्या उर्फ किशोर हरीभाऊ चांदणे (दोघेही रा. महात्मा फुले नगर, बुधवार पेठ, कराड) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे तर बापू चांदणे याने दिलेल्या फिर्यादीनुसार भानुदास धोत्रेवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या भानुदास धोत्रे व गोट्या चांदणे यांच्यावर उपजिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले.

शहरातील शनिवार पेठेत राहणारा भानुदास धोत्रे हा सल्या चेप्या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्याच्यावर या पूर्वीही अन्य गुन्हे दाखल आहेत. सध्या त्याच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली होती. मंगळवारी सल्या चेप्या गोळीबार प्रकरणाची येथील अतिरीक्त व जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होती. त्यासाठी सकाळी तो कराडात आला होता. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तो दुचाकीवरून भाजी मंडईकडून बसस्थानकाकडे निघाला होता. त्यावेळी बापू चांदणे व भानुदास धोत्रे समोरासमोर आले. त्यांनी एकमेकांवर खुनी हल्ला चढवला. सुरी व अन्य धारदार शस्त्राने एकमेकांवर वार केल्याने भानुदास धोत्रे व बापूचा चुलतभाऊ गोट्या चांदणे दोघेही जखमी झाले. घटनेनंतर परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उप अधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, वरीष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव अधिकारी व कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी दोन्ही जखमींना उपचारार्थ उपजिल्हा रूग्णालयात हलवले. तसेच न्यायालय परिसरासह प्रभात टॉकीज परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात केला. या घटनेची नोंद कराड शहर पोलिसात झाली आहे.

या घटनेमुळे गेली अनेक दिवस शांत असलेल्या शहरातील गँग वॉर पुन्हा एकदा भडकण्याची शक्यता आहे.

Post a Comment

 
Top