हरिद्वार- गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी २२ जूनपासून तब्बल १११ दिवस उपोषण करणारे पर्यावरणप्रेमी प्रो. जी. डी. अग्रवाल यांचे गुरुवारी दुपारी निधन झाले. प्रकृती खालावल्याने बुधवारी पोलिसांनी त्यांना बळजबरीने एम्स ऋषिकेशमध्ये दाखल केले होते. प्रो. अग्रवाल यांनी गुरुवारी सकाळी ६.४५ वाजता हाताने प्रेसनोट लिहून डॉक्टरांनी त्यांना तोंडावाटे आणि इंजेक्शनने पोटॅशियमची औषधे दिली असल्याचे सांगितले होते. मात्र, दुपारी दोनच्या सुमारास हरिद्वारहून दिल्लीला नेले जात असताना त्यांचे निधन झाले.
२० जुलै १९३२ रोजी उत्तर प्रदेशात मुजफ्फरनगर जिल्ह्यात कंधाला गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेले प्रो. अग्रवाल यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी (सध्याचे आयआयटी रुरकी) घेतली होती. कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी अभियांत्रिकीत पीएचडी केली. नंतर आयआयटी कानपूरमध्ये ते प्रोफेसर म्हणून कार्यरत होते.
मोदींना पत्र लिहून गंगेसाठी वेगळ्या कायद्याची मागणी, अविरत प्रवाहाची अधिसूचना काढताच दुसऱ्याच दिवशी निधन
गंगेतील अवैध उत्खनन व धरणांचे होत असलेले बांधकाम थांबवावे, अशी मागणी प्रा. अग्रवाल यांनी केली होती. नदीचा प्रवाह अविरत ठेवण्यात यावा तसेच गंगेच्या संबंधित सर्व मुद्द्यांवर त्यांनी सरकारला अनेकदा इशारा दिला. या वर्षी फेब्रुवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून गंगेसाठी वेगळा कायदा बनवण्याची मागणी केली होती. उत्तर न मिळाल्याने २२ जूनपासून ते उपोषणाला बसले. यादरम्यान केंद्रीय मंत्री उमा भारती व नितीन गडकरी यांनी उपोषण सोडण्याची विनंती केली होती. गंगेचा प्रवाह अविरत ठेवण्यासाठी सरकारने बुधवारी अधिसूचना जारी केली. पण गुरुवारी त्यांचे निधन झाले.
भागीरथी नदीवरील धरणाचे बांधकाम थांबवण्यासाठी उपोषण
भागीरथी नदीवरील धरणाचे बांधकाम थांबवण्यासाठी अग्रवाल यांनी २००९ मध्ये उपोषण केले व त्यांना यशही मिळाले. ते गंगा महासभेचे संरक्षकही होते.गंगा महासभेची स्थापना पं. मदनमोहन मालवीय यांनी १९०५ मध्ये केली होती. शेवटच्या काळात ते महात्मा गांधी चित्रकूट ग्रामोदय विद्यापीठात पर्यावरण विज्ञान विषयाचे मानद प्राध्यापक होते.
शेवटचे पत्र - एम्स ऋषिकेश, ११ ऑक्टोबर, २०१८, सकाळी ६.४५
बुधवारी दुपारी अंदाजे १ वाजता हरिद्वार प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मला मातृ सदनमधून जबरदस्तीने उचलून नेत एम्स ऋषिकेशमध्ये दाखल केले. माता गंगेचे संरक्षण आणि पुनरुद्धारासाठी माझी तपस्या सुरू असून यात डॉक्टरांची खूप मदत झाली. डॉक्टरांनी नाक व तोंडावाटे जबरदस्तीने अन्न दिले. आयव्ही लावले. सखोल तपासणी केल्यानंतर कळले की माझ्या रक्तात पोटॅशियमची कमतरता आहे. मग मी आयव्हीने रोज ५०० मिली लि. घेण्यास संमती दर्शवली. माझ्या या तपस्येत डॉक्टरांची खूप मदत झाली. मी एम्सच्या डॉक्टरांचा ऋणी आहे.
Post a Comment