पाथर्डी - लग्न जुळत नाही, मूल होत नाही, सासू-सुनांमधील भांडणे, काैटुंबिक कलह.... अशा अनेक समस्यांवर उपाय शाेधण्यासाठी गंगापूर तालुक्यातील भाेंदूबाबाला शरण गेलेल्या महिलांकडून विवस्त्रावस्थेत अघाेरी ‘साधना’ करून घेतली जात असल्याचा संतापजनक प्रकार नुकताच उघडकीस अाला. हा अमानुष प्रकार पाथर्डी तालुक्यातील मढी-मायंबा रस्त्यावरील घाटाच्या पहिल्या वळणापासून जवळच निर्जन ठिकाणी असलेल्या सूर्यकुंडावर सुरू असल्याचा दावा एका प्रत्यक्षदर्शीने ‘दिव्य मराठी’कडे केला अाहे.
गंगापूर (जि. औरंगाबाद) तालुक्यातील वाहेगाव परिसरातील भाेंदूबाबा व त्याचे अनुयायी यांच्या संगनमताने अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची काेणतीही भीडभाड न ठेवता राजराेस हा प्रकार सुरू अाहे. समस्याग्रस्त महिलांना एका जीपमध्ये दोन पुरुषांसह बसवून मढी परिसरातील निर्जन अशा सूर्यकुंडावर आणले जाते. अंतर्वस्त्रासह अंगावरचे सर्व कपडे काढून महिलांना कुंडामध्ये अंघाेळ करण्यास भाग पाडले जाते. त्यानंतर विवस्त्र अवस्थेत हे भाेंदूबाबा त्यांच्याकडून अघाेरी साधना करवून घेतात. विशेष म्हणजे या वेळी तिथे काही पुरुषही उपस्थित असतात. या अघाेरी साधनेनंतर एक काळी बाहुली, बिबा आणि लिंबू जवळच्याच एका जांभळीच्या झाडाला ठोकले जाते. हा ‘विधी’ पूर्ण केल्यानंतर दुसरे वस्त्र परिधान करून सदर महिलांना एका जीपमधून त्यांच्या गावी नेऊन सोडले जाते. जुनी वस्त्रे तिथेच फेकून दिली जातात. ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने घटनास्थळी भेट दिली असता तिथे महिलांच्या साड्या, ब्लाऊज, परकर अशा अनेक वस्त्रांचा ढीग पडल्याचे दिसून अाले. परिसरातील गरीब महिलांनी यापैकी काही वस्त्रे वापरण्यास नेली अाहेत, तर काहींनी उर्वरित वस्त्रे जाळल्याचे दिसून अाले.
अाैरंगाबादच्या गंगापूर व नगरच्या नेवासे परिसरातील काही भोंदू मांत्रिक चार-दोन शिष्यांसह येथे येतात. या अघाेरी साधनेसाठीचा वाहन खर्च भाविकांकडून वसूल केला जातो. घटनास्थळी भेट दिली असता अनेक धक्कादायक पुरावे आढळले. परिसरातील लाेकांनी दिलेल्या माहितीनुसार, बाहेरगावहून गाड्यांमधून महिला येतात. बरोबर दोन-चार पुरुष असतात. ते घरचे असतील असे वाटत नाही. एजंटसारखा दिसणारा दणकट देहयष्टीचा माणूस कुंडाजवळ जाऊन सर्वांना एकत्र बोलवत सूचना देत असताे. त्यानंतर महिला अंगावरील सर्व कपडे काढून स्नान करतात. तशा अवस्थेत पाण्याबाहेर येऊन काही मिनिटे भाेंदूबाबा सांगताे तशी साधना करतात व नंतर वाळलेले कपडे घालतात.
त्यानंतर स्नानापूर्वी जेथे कपडे सोडले तेथे कापूर जाळून मंत्रविधी केला जातो. काही अल्पवयीन मुलींचे कपडेही इथे दिसतात. दरम्यान, या प्रकाराची चर्चा गावात झाल्यावर संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी (२७ ऑक्टोबर) तेथे जाऊन भाेंदूबाबासह काही लाेकांना तेथून पळवून लावले हाेते.
महिला शोषणाची भीती
महिलांची विटंबना संतापजनक आहे. नाथ संप्रदायाने महिलांचा सन्मान केला. महिलांची फसवणूक व शोषणाविरुद्ध भोंदूबाबा व त्यांच्या एजंटांविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत. अशा प्रकारातून महिलांचे शोषण होण्याची भीती वाटते.
ज्योती मरकड, सहसचिव, मढी देवस्थान.
‘आम्ही साधकांना पिटाळून लावले’
या संदर्भात मढी गावातील एका तरुणाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, अमावस्या आणि पौर्णिमेला या ठिकाणी ट्रॅक्स भरून महिलांना आणले जाते. चार-पाच महिला आणि दोन पुरुष गाडीत असतात, हे मी पाहिलेले आहे. रात्रीच्या अंधारात ही अघोरी कृत्ये चालतात. प्रत्यक्ष पूजा कशी चालते, हे पाहायला यायची माझी हिम्मत झाली नाही. पण अमावस्या आणि पौर्णिमेला रात्री निर्जनस्थळी होणारी पूजा कशा प्रकारे होते हे त्या बाबतीत माहिती असणाऱ्या व्यक्तीने सांगितले आहे. शिवाय, त्या जागी आढळणारी महिलांची वस्त्रे पाहाता इथेही तशीच पूजा होते या विषयी आम्हाला खात्री आहे. अशा पूजेसाठी आलेल्या साधकांच्या गाडीला मी स्वत:च पिटाळून लावले आहे'.
एजंट म्हणतात.. भानामतीपासून मुक्ती
भाेंदूबाबाच्या गंगापूर तालुक्यातील एका एजंटशी ‘दिव्य मराठी’ने संपर्क साधून बोलते करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो गडबडून गेला. ‘वाडगाव येथील बाबांनी आम्हाला येथे जाऊन असा विधी करण्यास सांगितले. करणी, भानामती, जादूटोणा, रोगराई अशा विविध प्रकारांतून मुक्तता अशा विधीने मिळते, असे ते सांगतात. महिला स्वखुशीने अंघोळ करतात...’ एवढेच सांगून त्याने अधिक भाष्य करणे टाळले व काढता पाय घेतला.
अघाेरी प्रथा त्वरित थांबवू, संबंधितांवर कारवाई करणार
मढी देवस्थानच्या नावाखाली भोळ्या महिलांची फसवणूक करण्याचा प्रकार लज्जास्पद आहे. हा अघोरी प्रकार गावात माहीत नव्हता. आता आम्ही ग्रामपंचायतीमार्फत जनजागृती करून सूर्यकुंड परिसर स्वच्छ करू. नाथांची तप करण्याची ही पवित्र जागा आहे. त्याचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी प्रयत्न केले जातील. हा प्रकार तातडीने बंद व्हावा यासाठी कारवाई करू.
- रखमाबाई मरकड, सरपंच, मढ

Post a Comment