0
 • जयपूर/ भोपाळ/पाटणा - राजस्थानात झिका विषाणूची आणखी आठ प्रकरणे समोर आली. त्यामुळे झिकामुळे आजारी रुग्णंची संख्या ५० वर पोहोचली आहे. त्यापैकी बहुतांश जयपूरचे आहेत. शुक्रवारी या प्रकरणांची पुष्टी करण्यात आली. देशभरात चार प्रकरणे समोर आली आहेत. स्वाइन फ्लूमध्ये राजस्थान पहिल्या क्रमांकावर आहे. डेंग्यूमध्ये राज्य पाचव्या क्रमांकावर आहे. दोन दिवसांपूर्वी बिहारमध्ये एक रुग्ण झिकाने ग्रस्त आढळून आला होता. पश्चिम बंगालमध्ये सरकारने सतर्कतेचा इशारा दिला आहे. जनतेला सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


  दुसरीकडे राजस्थानमध्ये झिकाचे वाढते संकट लक्षात घेऊन शेजारील मध्य प्रदेशात झिका विषाणूच्या संसर्गासंबंधी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थानच्या सर्व प्रांतात इशारा दिलेला आहे. उज्जैन, ग्वाल्हेर भागात विशेष अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याशिवाय राजस्थानमधून येणाऱ्या सर्व रुग्णांची झिका व्हायरस चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. भोपाळमध्येही एम्स येथे झिका चाचणी करण्याची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली.
  झिका संसर्गापासून बालकांना धोका, जन्मजात विकृतीची शंका 
  झिका संक्रमणाची सुरूवात सामान्य तापाने होते. संसर्ग झालेल्या व्यक्तीला जास्त थकवा, शरीरभर अचानक चट्टे येऊ लागतात. डोळे येणे, सांधेदुखी, मांसपेशींमध्ये वेदना होतात. डोकेदुखी सारखी लक्षणे आढळून येतात. अशा लक्षणांचा अनुभव आल्यानंतरही रुग्णाला संक्रमण झाल्याचे लक्षात येत नाही. गर्भावस्थेत त्याचा परिणाम दिसून येतो. होणाऱ्या बाळात विकृती येऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

  जयपूर : संसर्ग असलेल्या भागात २७६ पथके तैनात 
  राजस्थान सरकारने झिकाचा संसर्ग झाल्यानंतर आता डॅमेज कंट्रोल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जयपूरच्या शास्त्रीनगरमध्ये २७६ पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकाने ११ हजाराहून जास्त घरांत पाहणी केली. त्यात २२८२ प्रकरणांत झिकाच्या संसर्गासाठी कारणीभूत असलेल्या डासांचे अंश आढळून आले. सुमारे ४० हजार कंटेनरचादेखील तपास करण्यात आला. त्यातही झिकाचे अंश दिसून आले. संशयित गर्भवती ५८ महिला व ताप असलेल्या ७५ जणांचे रक्त व मूत्र नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. संसर्ग रोखण्यासाठी व्यापक प्रयत्न केले जात आहेत.

  झिका व्हायरसचा शोध १९४७ मध्ये युगांडा येथे लागला, पुढे ८६ देशांत तो आढळला 
  जगात झिका व्हायरसचा शोध १९४७ मध्ये युगांडामध्ये लागला होता. त्यानंतर हा व्हायरस ८६ देशांत आढळून आला. नोव्हेंबर २०१६ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार झिकाला घाबरून जाण्याची गरज नाही. जागतिक पातळीवर या संकटाचा मुकाबला केला जाऊ शकतो. त्यासाठी काही प्रमाणात खबरादारी बाळगली पाहिजे. त्यामुळे विषाणूचा नायनाट होऊ शकेल, असे संघटनेने म्हटले होते.

  २० दिवसांपूर्वी पहिले प्रकरण समोर आले, राज्याच्या पर्यटनावर वाईट परिणाम 
  राजस्थानात झिकाचा पहिला रुग्ण २२ सप्टेंबरला आढळून आला होता. राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव (वैद्यकीय व आरोग्य) विणू गुप्ता म्हणाल्या, ३० जणांवर उपचार झाले. आता त्यांची प्रकृती ठीक आहे. झिकाचा संसर्ग वाढल्याने त्याचा राज्याच्या पर्यटन क्षेत्रावर झाला असून पर्यटकांच्या संख्येत ३० टक्क्यांनी घट झाली आहे.

Post a Comment

 
Top