0
 • कोपरगाव - येथील दुय्यम कारागृहातील कोठडीतील कोळपेवाडी दरोड्यातील आरोपींसह १७ जणांनी संडासातील भांडे फोडून रविवारी पहाटे पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे ते यशस्वी होऊ शकले नाही. रविवारी पहाटे २ ते ४ दरम्यान ही घटना घडली. कॉन्स्टेबल समाधान नानासाहेब वर्पे यांनी कोठडीतील सर्व आरोपींची मोजणी करून पहाटे ४ ते ६ च्या पहारा ड्यूटीस असलेले कॉन्स्टेबल अमोल सुरेश ढोके यांना चार्ज दिला. पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी तीन क्रमांकाच्या कोठडीतून भिंत खरडल्याचा आवाज आल्याने ढोके यांनी सहायक फौजदार बाबासाहेब शिंदे यांच्यासह आरोपींकडे चौकशी केली. पण आरोपींनी काहीच प्रत्युत्तर न दिल्याने त्यांना संशय आला. लागलीच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळवून कोठडी तपासण्यासाठी जादा कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन येण्याची विनंती केली. पंधरा मिनिटांत पोलिस अधिकारी व कर्मचारी हजर झाले. त्यानंतर या कोठडीतील १७ आरोपींना बाहेर काढून कोठडीची तपासणी केली असता त्यातील संडासचे भांडे पूर्णपणे तोडलेले दिसले. शिवाय, तिथेच स्टीलचे वाकलेले ताट, धातूची तार व तुटलेले नेलकटर असे साहित्य आणि बाजूलाच मातीचा ढिगारा व संडासच्या भांड्याचे तुकडे पडलेले दिसले.


  या कारागृहातून यापूर्वीही कैद्यांच्या पलायनाच्या अनेक घटना घडल्या आहेत. कुप्रसिद्ध गुन्हेगार नागऱ्या आपल्या सहा साथीदारांसह पळून गेल्यानंतर आता कोळपेवाडी दरोड्यातील आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.
  पलायन करण्याच्या प्रयत्नातील आरोपी 
  सुंदरलाल भोसले (४०, हिंगणी), जितू भोसले (३९, जोगेश्वरी, जि. औरंगाबाद), किरण काळे (२४, नेवासे), शुभम काळे (२०, वर्धा), क्रांती भोसले (२२, हसनाबाद, जि. जालना), रवींद्र जेजूरकर (३२, राहाता), अमोल जाधव (२०, मानोरी, ता. राहुरी), अनिल बागूल (२०, दैवत, जि. जळगाव), सिद्धार्थ तुपे (२४, शिर्डी), राहुल कुऱ्हाडे (१८, राहाता), हरीश देसाई (३२, अस्तगाव), जगन्नाथ अभक (३०, रुई, राहाता), संतोष जगताप (२५, निमगाव), आकाश परदेशी (२३, सावळीविहीर, राहाता), विलास कुसारे (४१, सुरेगाव), रवींद्र मेहरे (२५, पुणतांबे), प्रवीण पवार (२७, शिर्डी)
  ५ कोठड्यांत ७४ आरोपी 
  या कारागृहात ५ लॉकअप असून त्यापैकी एकात पोलिस कोठडीतील व इतर चारमध्ये न्यायालयीन कोठडीतील आरोपी ठेवले जातात. या सर्व लॉकअपमध्ये ७४ आरोपींना ठेवण्यात आले आहे.

  गुन्हेगारी, कोळपेवाडी दरोड्यातील अटक केलेल्या आरोपीचाही समावेश

  • 17 jail inmates try to escape from prison

Post a Comment

 
Top