0
  • मनमाड- मनमाड रेल्वेस्थानकावरील अनधिकृत खाद्यपेय विक्रीच्या वादात कट रचत स्थानिक २० जणांसह मुंबईचे २० अशा एकूण ४० जणांच्या गुंडांच्या टोळीने मंगळवारी रात्री जमधाडे चौकात चाॅपरच्या साह्याने दहशत माजवली. या वेळी झालेल्या हाणामारीत समीर ऊर्फ पापा नूर शेख (४५, एकतानगर, इंडियन हायस्कूल) याचा बेदम मारहाण करून खून करण्यात आला.


    या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली अाहे. आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मृताच्या नातेवाइकांनी पोलिस स्थानकावर माेर्चा काढून धरणे अांदाेलन केले. याप्रकरणी १९ जणांना अटक केली असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे. जिल्ह्यातील सर्व पोलिस यंत्रणा मनमाडला तळ ठोकून आहे. या घटनेनंतर पोलिस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी घटनास्थळी पाहणी केली. ठसेतज्ज्ञांचे पथक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह वरिष्ठ पोलिस अधिकारी पहाटेपासून तळ ठोकून आहेत. मृताची पत्नी नुसरत समीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी इलियास इस्माईल सय्यद व इतर ३९ अशा एकूण ४० जणांविरुद्ध हत्या, दंगल घडवणे, मारहाण अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले असून १९ आरोपींना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Post a comment

 
Top